सकाळी ठीक १० वाजून ३८ मिनिटांनी.. ओह नो, अरेरे, शट् अशा असंख्य हुंकारांनिशी वानखेडेवरील वातावरणात क्षणार्धात स्तब्धता आणि नि:शब्दता पसरली.. लिओनाडरे द विन्सीने चितारलेल्या मोनालिसाच्या अजरामर चित्राप्रमाणेच सचिन तेंडुलकरच्या बॅटने एक अविस्मरणीय कलाकृती साकारत होती.. परंतु नरसिंग देवनरिनच्या ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूमुळे ही कलाकृती अपूर्ण राहिली.. हा चेंडू खरे तर कट करण्याचा सचिनचा इरादा होता.. पण चेंडूने अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतली आणि सचिनचा तो फटका पहिल्या स्लिपमध्ये उभ्या डॅरेन सॅमीच्या हातात विसावला आणि वानखेडेवर सन्नाटा पसरला.. सचिनच्या कारकिर्दीतील दोनशेव्या आणि अखेरच्या कसोटीत शतकाकडे कूच करणारी ती शानदार खेळी संपली.. मग क्रिकेटच्या दुनियेवर गेली २४ वष्रे अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनला मग वानखेडेवर उपस्थित ३१ हजार क्रिकेटरसिकांनी उभे राहून अभिवादन करीत मानाचा मुजरा केला आणि हा टाळ्यांचा कडकडाट सचिन ड्रेसिंग रूमकडे जाईपर्यंत सुरू होता.. सचिनने जड पावलाने मैदान सोडले.. या प्रवासात त्याने आभाळाकडे पाहून क्षणभर डोळे मिटले. मग प्रेक्षकांना बॅट दाखवत तो परतत होता, त्या वेळी शतक हुकल्याची खंत जरी क्षणभर त्याला वाटली तरी एक चांगली खेळी साकारल्याचे समाधानही त्याला होते. क्रिकेटच्या या सच्च्या राजदूताची ही मैदानावरील अखेरची खेळीच ठरण्याची शक्यता आहे. कारण वेस्ट इंडिजची सद्यस्थिती पाहता सचिनला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळणे कठीण आहे.
१५ नोव्हेंबर याच दिवशी १९८९मध्ये सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. नेमक्या त्याच दिवशी आपल्या कारकिर्दीतील अखेरच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याला ७४ धावांची खेळी साकारता आली. १५० मिनिटे आणि ११८ चेंडूंमध्ये १२ चौकारांनिशी सचिनने ही संयमी खेळी साकारली. सचिनचा झेल घेणारा वेस्ट इंडिजचा कर्णधार सॅमीच्या हाताला कुणी ‘हँड ऑफ गॉड’ अशी उपमा दिल्यास वावगे ठरणार नाही. सॅमीच्या झेलनेच जसे सचिनचे ऐतिहासिक कसोटी सामन्यातील शतक हुकले, तसेच २०११मध्ये सचिनच्या महाशतकाच्या महाअपेक्षा भंग करण्यातही त्याचा सिंहाचा वाटा होता. त्या वेळी रवी रामपॉलच्या चेंडूवर ९४ धावांवर दुसऱ्या स्लिपमध्ये सॅमीनेच सचिनचा झेल टिपला होता.
गुरुवारी नजाकती फटक्यांनी आपल्या खेळीला प्रारंभ करणाऱ्या सचिनने शुक्रवारी सकाळीही तितक्याच आत्मविश्वासाने सावधपणे आपली खेळी हळूवारपणे फुलवत नेली. सकाळी शेन शिलिंगफोर्डच्या चेंडूवर पॉइंटला मोकळ्या जागेत आपला सातवा चौकार ठोकून सचिनने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना सावधतेचा इशारा दिला. मग पुढच्या चेंडूवर लेगकडील क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना भेदून पॅडल स्विपद्वारे चौकार वसूल केला. परंतु सकाळच्या सत्रातील खेळपट्टीची योग्य साथ घेऊन टिनो बेस्टने सचिनवर उसळणाऱ्या चेंडूंचा प्रहार केला. पण सचिनने एकाग्रता भंग न पावू देता समर्थपणे आपला बचाव केला. बेस्टलाच स्ट्रेट ड्राइव्हद्वारे चौकार खेचून सचिनने आपले वैयक्तिक ६८वे तर वानखेडेवरील आठवे अर्धशतक साजरे केले.
अर्धशतकानंतर सचिनने शिलिंगफोर्डला बॅकवर्ड पॉइंटला चौकार मारला, तर बेस्टला कव्हर ड्राइव्ह, शेनॉन गॅब्रिएलला स्ट्रेट ड्राइव्ह मारून सचिन मजल-दरमजल करीत शतकाकडे वाटचाल करीत होता. पण गुरुवारी एकही न चेंडू टाकणाऱ्या देवनरिनने शुक्रवारी आपल्या फिरकीच्या चक्रव्यूहात सचिनला अडकवले. सचिन बाद झाला आणि काही मिनिटांमध्येच वानखेडे स्टेडियम ओस पडले. पण त्यानंतर भारतीय संघ क्षेत्ररक्षणासाठी आला तेव्हा पुन्हा सचिननामाचा अविरत जल्लोष सुरू झाला आणि क्रिकेटरसिकांनी त्याला पुन्हा उभे राहून अभिवादन केले.

Story img Loader