मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने निवृत्ती जाहीर केली असली तरी हा निर्णय काही जणांच्या पचनी पडताना दिसत नाही. श्रीलंकेचे माजी विश्वविजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा याबाबत म्हणाले की, सचिनने अजून कसोटी क्रिकेट खेळत राहायला हवे, कारण ती खेळाची गरज आहे.
‘‘खेळाची गरज म्हणून आणि लोकांना त्याची फलंदाजी पाहणे आवडते म्हणून सचिनने कसोटी क्रिकेट यापुढेही खेळायला हवे, अशी शुभेच्छा मी त्याला देईन. मला अशी आशा आहे की, ज्याप्रमाणे क्रिकेट खेळत असताना सचिनने कसोटी क्रिकेटला पाठिंबा दिला, तसाच त्याने निवृत्तीनंतरही द्यायला हवा,’’ असे रणतुंगा यांनी एका कार्यक्रमाच्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. या वेळी स्वत:च्या निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी तीन दिवस लागल्याचे रणतुंगा यांनी सांगितले.
‘‘निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी मला तीन दिवस लागले, त्यावेळी मी विमा मध्यस्थी, व्यावसायिक आणि अर्धवेळ राजकारणी होतो, पण सचिनला मात्र निवृत्तीचा निर्णय घेणे फार कठीण गेले असेल. तो खाताना, झोपताना आणि श्वास घेताना क्रिकेटचा विचार करत नाही, तर आंघोळ करतानाही तो क्रिकेटचाच विचार करत असेल, असे मला वाटते,’’ असे रणतुंगा म्हणाले.
रणतुंगा यांच्या मते सचिन हा नम्रतेचा सारांश होता. ते पुढे म्हणाले की, ‘‘सचिन कधीच बदलला नाही आणि एक लक्ष धावा त्याने केल्या तरीही तो बदलणार नाही, कारण तो धावांचा भुकेला असून सतत खेळाचाच विचार त्याच्या डोक्यात असतो. माझ्यासाठी सचिन हा उत्तम अनुकरणीय व्यक्ती आहे. जेव्हा मी जगभरात क्रिकेटबद्दल बोलेन, तेव्हा सचिनचा उल्लेख आल्याशिवाय राहणार नाही.’’

Story img Loader