नुकतीच निवृत्ती पत्करणारा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिसला भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शुभेच्छा दिल्या आहेत. याचप्रमाणे त्याला ‘खराखुरा चॅम्पियन’ असे संबोधत निवृत्तीनंतरचे आयुष्य वाईट नसते, असा सल्लाही दिला आहे.
‘‘अप्रतिम कारकिर्दीबद्दल अभिनंदन. तू क्रिकेट खेळ भावनेनेच खेळलास. तुझ्यासमोर खेळताना नेहमीच मला आनंद मिळाला. जॅक, तू खराखुरा ‘चॅम्पियन’ आहेस. तुला एक सांगू इच्छितो की, निवृत्तीनंतरचे आयुष्य वाईट नसते,’’ असा संदेश सचिनने ‘ट्विटर’च्या माध्यमातून कॅलिसला दिला आहे. सचिनने गेल्या महिन्यात निवृत्ती स्वीकारत क्रिकेटविश्वाला अलविदा केला होता.
सध्याच्या पिढीचा कॅलिस हा एक महान अष्टपैलू खेळाडू होता. १८ वर्षे कॅलिसने संघासह क्रिकेटची सेवा केली आणि त्याच्या कारकिर्दीचा शेवटही गोड झाला. अखेरच्या सामन्यात कॅलिसने शतक झळकावले, तर संघानेही दमदार कामगिरी करत कॅलिसला विजयाने अलविदा केला.
डिसेंबर १९९५मध्ये कॅलिसने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. निवृत्तीच्या सामन्यात शतक झळकावून कॅलिसने सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. ३८ वर्षीय कॅलिसने १६६ कसोटी सामन्यांमध्ये १३,२८९ धावा केल्या, त्याच्यापुढे सचिन तेंडुलकर (१५९२१) आणि रिकी पॉन्टिंग (१३,३७८) हे दोनच फलंदाज आहेत. अप्रतिम फलंदाजीबरोबरच त्याने २९२ बळी मिळवले असून २०० झेलही टिपले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ४५ शतके असून त्याच्यापुढे फक्त सचिन तेंडुलकर (५१ शतके) आहेत.
कसोटी क्रिकेटला कॅलिसने अलविदा केला असला तरी तो यापुढेही एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. आतापर्यंत ३२५ एकदिवसीय सामन्यांमध्ये कॅलिसने ११, ५७४ धावा केल्या असून २७३ बळी मिळवले आहेत.

Story img Loader