सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतानाची शैली आणि ४० व्या वर्षी कसोटी खेळतानाची शैली याचा विचार केला तर गेल्या दोन तपांमध्ये त्याच्या शैलीत काहीही फरक झालेला नाही. आजही पूर्वीइतकीच नजाकत त्याच्या शैलीत दिसून येते. फलंदाजीमधील विविध फटक्यांचा अविरत खजिना लाभलेला खेळाडू म्हणूनच मी त्याच्याकडे पाहतो.
खेळाडू व भारतीय निवड समितीचा सदस्य म्हणून मी गेली पंचवीसपेक्षा जास्त वर्षे सचिनचा खेळ पाहत आलो आहे. अव्वल दर्जाच्या फलंदाजाकडे असणारे सर्व गुण त्याच्याकडे आहेत. खेळण्याचे तंत्र, शैली व लकब या सर्व गोष्टी त्याने गेली पंचवीस वर्षे सातत्याने टिकविल्या आहेत. समोर कोणताही गोलंदाज असला तरी त्याचा चेंडू सीमारेषेपलीकडे पाठविण्यासाठी योग्य टायमिंगची आवश्यकता असते. याबाबत सचिनचा हात कोणी धरू शकणार नाही. ऑनड्राइव्ह, कव्हरड्राइव्ह यांसारखे फटके फक्त सचिनकडूनच पाहणे योग्य असते. अनेक महान फलंदाजांची शैली वयानुसार बदलत गेली आहे. सचिनबाबत असे काहीही घडलेले नाही. त्याची फलंदाजीची शैली अजूनही नितांत सुंदर व प्रेक्षणीयच आहे.
सचिनच्या अनेक खेळी माझ्या दृष्टीने संस्मरणीय आहेत. विश्वचषक स्पर्धेत रावळपिंडी एक्स्प्रेस अशी ख्याती लाभलेल्या शोएब अख्तर याच्या गोलंदाजीवर सचिनने ठोकलेले षटकार म्हणजे अचूक फटकेबाजीचा सर्वोत्तम नमुना होता. त्याच्या या फटकेबाजीमुळे अख्तरच्या गोलंदाजीचे पुरते धिंडवडेच उडाले आणि कालांतराने अख्तरचे पाकिस्तान संघातील स्थानही संपुष्टात आले. संघास डोईजड होणाऱ्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांची दिशा व टप्पा बिघडवून टाकण्यात सचिन हा माहिर फलंदाज मानला जातो. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सचिनच्या शतकाच्या जोरावर भारताने पावणेचारशे धावांचे लक्ष्य साध्य करीत विजय मिळविला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन येथील कसोटीत सचिनने केलेल्या शतकामुळे भारतास सामना व मालिका अनिर्णीत ठेवता आली होती. सचिनच्या या तीन खेळी अतुलनीयच आहेत.
त्याच्या कारकिर्दीकडे पाहिले की फलंदाजीचे अनेक विक्रम त्याने मोडले आहेत, हे स्पष्ट आहेच. एवढे करूनही त्याची धावांची भूक कधी कमी झालेली नाही. तो कधीही विक्रमासाठी खेळलेला नाही. संघासाठीच त्याने आजपर्यंत फलंदाजी केली आहे.
श्रेष्ठ फलंदाजांच्या मालिकेतील श्रेष्ठ फलंदाज म्हणूनच त्याची ख्याती आहे. एवढे असूनही त्याची प्रतिमा शालीनच राहिली आहे. त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत असे म्हणण्यापलीकडेच त्याची विनम्रता दिसून येत असते. त्याच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक खेळाडूला तो आपला मित्र मानत असतो. त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या खेळाडूबरोबर दोस्ती करण्यात त्याला कधी कमीपणा वाटलेला नाही.
खेळावर व संघावर कशी निष्ठा पाहिजे, सर्वोच्च यश मिळविण्यासाठी जिद्द, आत्मविश्वास व चिकाटी कशी ठेवली पाहिजे हे सचिनकडूनच शिकले पाहिजे. त्याच्यापेक्षा वयाने मोठे असलेले खेळाडूही मैदानावर त्याच्याकडून अनेक वेळा सल्ला घेत असतात हे मी अगदी जवळून पाहिले आहे. हाच त्याच्याकडे असलेला विशेष गुण आहे. केवळ भारत नव्हे तर जगास लाभलेला मुलखावेगळा क्रिकेटपटू म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते. तो स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी त्याची फलंदाजीची शैली सदोदित युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायक ठरणार आहे.
नजाकती फटक्यांचा खजिना
सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतानाची शैली आणि ४० व्या वर्षी कसोटी खेळतानाची शैली याचा विचार केला
First published on: 13-11-2013 at 12:38 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkar treasure of excellent strokes surendra bhave