माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने एक आकळावेगळा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत तसं पाहिलं तर अगदी सामान्यपणे पाहायला मिळणारं चित्र म्हणजे काही मुलं क्रिकेट खेळत असतात. मात्र, सचिनने हा व्हि़डीओ ट्वीट केलाय म्हणजेच यात काही खासही आहे. या व्हिडीओत एक मुलगी फलंदाजी करत आहे, एक मुलगा गोलंदाजी करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यष्टीरक्षणाला कुणी माणूस नाही तर चक्क एक कुत्रा उभा आहे. या कुत्र्याची क्रिकेटमधील चपळाई पाहून सचिनही अवाक झालाय.
सचिनने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, “मला हा व्हिडीओ एका मित्राने पाठवला आहे. हा व्हिडीओ पाहून हे काही चेंडू पकडण्याची तीक्ष्ण कौशल्य आहेत.”
“आपण यष्टीरक्षण, क्षेत्ररक्षक आणि अष्टपैलू खेळाडू पाहिलेत. पण याला आपण काय नाव देऊ?” असंही सचिनने विचारले आहे.
सचिनने ट्वीट केलेल्या व्हिडीओत नेमकं काय घडतंय?
या व्हिडीओत एक लहान मुलगा गोलंदाजी करताना आणि मुलगी फलंदाजी करताना दिसत आहे. मुलगा पहिला चेंडू टाकतो आणि तो मुलीच्या बॅटला न लागता मागे जात असतो. तेवढ्यात एक कुत्रा येऊन तो चेंडू तोंडात पकडतो आणि तो चेंडू गोलंदाजी करणाऱ्या मुलाकडे नेऊन देतो. यानंतर हा कुत्रा अगदी माणसाप्रमाणे पुन्हा यष्टीरक्षकाच्या जागेवर येऊन चेंडू अडवण्यासाठी उभा राहतो. गोलंदाज दुसरा चेंडू टाकतो आणि फलंदाज मुलगी हा चेंडू समोर टोलवते. हे पाहून हा कुत्रा तात्काळ क्षेत्ररक्षण करण्यासाठी समोर पळतो आणि चेंडू पकडून गोलंदाज मुलाकडे देतो.
हेही वाचा : IPL 2021: मुंबई इंडियन्सने तीन खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये केला सन्मान; सचिन तेंडुलकरने इशानच्या…
तिसऱ्या चेंडू टाकण्याआधी कुत्रा पुन्हा यष्टीरक्षकाच्या जागेवर येऊन चेंडूकडे लक्ष देतो. गोलंदाज तिसरा चेंडू टाकतो. हा चेंडू देखील फलंदाजी करणारी मुलगी समोर मारते. त्यावर कुत्रा पुन्हा धावत जाऊन हा चेंडू पकडतो आणि गोलंदाज मुलाकडे आणून देतो. तसेच लगेच यष्टीरक्षकाचं काम करायला आपल्या जागेवर येतो. पुढचा चौथा चेंडू मुलीला मारता येत नाही. तो तिच्या शरीराला लागून खाली पडतो. यानंतर हा कुत्रा समोर जाऊन तो बॉल पकडतो आणि गोलंदाज मुलाकडे देतो. पुढचा पाचवा चेंडू बॅटला न लागता मागे जातो. यानंतर हा कुत्रा धावत चेंडू पकडायला जातो मात्र तोपर्यंत शेजारच्या एका मुलाने तो चेंडू गोलंदाज मुलाकडे दिलेला असतो.