Sachin Tendulkar Birthday Special: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर २४ एप्रिल २०२३ रोजी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. संपूर्ण जग त्याला क्रिकेटचा देव मानते. या दिग्गज खेळाडूने आपल्या २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत एकापेक्षा एक गोलंदाजांचा सामना केला आणि त्यांची धुलाई केली. सचिनने अनेक जागतिक दर्जाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आणि अनेक विक्रमांची नोंद केली. पण असाही एक गोलंदाज होता, ज्याला क्रिकेटचा देव म्हणवल्या जाणाऱ्या सचिनलाही भीती वाटत होती. त्याने स्वतःही हे मान्य केले आहे.
आपल्या कारकिर्दीत सचिनने वसीम अक्रम, वकार युनूस, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, अॅलन डोनाल्ड आणि कर्टली अॅम्ब्रोस यांसारख्या महान गोलंदाजांचा सामना केला. पण कुणालाही कल्पना नसेल, पण अशा एका गोलंदाजाचा सामना करताना सचिनला भीती वाटत होती. हा गोलंदाज दक्षिण आफ्रिकेचा कर्णधारही राहिला आहे.
सचिन तेंडुलकर या गोलंदाजाला घाबरत होता –
मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात खुलासा केला होता की,दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएचा सामना करताना तो खूप घाबरतहोता. सचिन म्हणाला होता की, “मी १९८९ खेळायला सुरुवात केली,तेव्हापासून मी किमान २५ जागतिक दर्जाच्या गोलंदाजांचा सामना केला आहे, परंतु मी ज्यांच्याविरुद्ध फलंदाजी करण्यास टाळाटाळ करायचो तो म्हणजे हॅन्सी क्रोनिए होता.”
जेव्हा सचिन म्हणाला होता, ‘क्रोनिएच्या चेंडूवर स्ट्राइकवर राहण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा’
सचिनने आपल्या विधानात पुढे म्हटले होते की, ” कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मी त्याच्या चेंडूवर आऊट होत होतो. त्यामुळे मला वाटू लागले होते की, मी नॉन-स्ट्राइकवर उभा असलेलाच बरा आहे. मी खेळपट्टीवर इतर फलंदाजांना सांगायचो की, शॉन पोलॉक किंवा अॅलन डोनाल्ड गोलंदाजी करायला आले, तर मी त्यांची काळजी घेईन. पण क्रोनिएच्या चेंडूवर स्ट्राइकवर राहण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.”
हॅन्सी क्रोनिएने सचिनला ८ वेळा बाद केले –
हॅन्सी क्रोनिए हा अर्धवेळ मध्यमगती गोलंदाज होता, पण तो त्याच्या अचूक लाईन आणि लेंथने फलंदाजांना चकित करत असे. त्याने सचिन तेंडुलकरला एकूण ८ वेळा बाद केले. त्याने ३२ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३ वेळा सचिनला आपला बळी बनवला, तर ११ कसोटी सामन्यात ५ वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
हॅन्सी क्रोनिएची क्रिकेट कारकीर्द –
हॅन्सी क्रोनिए हा दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू फलंदाज होता. त्याने ६८ कसोटीत ३७१४ धावा केल्या आणि ४३ बळीही घेतले. या खेळाडूने १८८ वनडेत ११४ विकेट घेतल्या आहेत.
हेही वाचा – IPL 2023 RCB vs RR: यशस्वी जयस्वालच्या डायरेक्ट थ्रोने डुप्लेसिसला पाठवले तंबूत; पाहा धावबादचा शानदार VIDEO
विमान अपघातात मृत्यू झाला –
हॅन्सी क्रोनिएला २००० मध्ये मॅच फिक्सिंगमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या क्रिकेट खेळण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. त्याने मॅच फिक्सिंग आणि मध्यस्थांशी संपर्क केल्याची कबुली दिली होती. दोन वर्षांनंतर २००२ मध्ये त्याचा विमान अपघातात मृत्यू झाला.