सचिन तेंडुलकरचे मुंबईच्या संघासोबत यापुढे नसणे, हा आमचा मोठा तोटा असेल. भारतीय संघाप्रमाणेच मुंबई संघातही ही पोकळी नक्कीच जाणवेल. सचिनची उणीव या हंगामात आम्हाला जाणवेल, असे मत मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
रविवारपासून लाहली येथे सुरू होणाऱ्या हरयाणाविरुद्धच्या लढतीने मुंबईच्या रणजी मोसमाला प्रारंभ होणार आहे. हा सामना सचिनच्या कारकिर्दीतील अखेरचा रणजी सामना ठरणार आहे. त्यासाठी सचिन वानखेडेवर मुंबईच्या संघासोबत कसून सराव करीत आहे. या वेळी मुंबईचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांनी आपल्या भावना प्रकट करताना सांगितले की, ‘‘वानखेडेवरील ड्रेसिंग रूमची एक परंपरा आहे. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री, वासिम जाफर यांच्या खुर्चीचा मान राखला जातो. त्यावर कुणी मग बसत नाही. याचप्रमाणे सचिनचीसुद्धा विशिष्ट जागा आहे, खुर्ची आहे. त्या जागेवर सचिनच बसणार, हे आम्हा सर्वाना माहीत असायचे. ती जागा आता रिक्त होईल. त्यामुळे ते रितेपण आम्हाला तीव्रतेने जाणवेल.’’
‘‘सचिन तेंडुलकर ही महान व्यक्ती आहे. सचिनसारखी दुसरी व्यक्ती होणे मुश्कील आहे, परंतु आयुष्य निरंतर चालूच राहते, हे आपल्याला विसरता कामा नये,’’ असे कुलकर्णी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘मला आठवते गावस्करच्या निवृत्तीच्या वेळी पुढे काय, असा प्रश्न क्रिकेटरसिकांना सतावत होता. त्या काळात आजच्यासारखे एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटचे इतके सामने व्हायचे नाहीत. त्यामुळे गावस्कर यांनाही क्रिकेटजगातील देव मानले जायचे. गावस्करप्रमाणे दुसरी व्यक्ती घडेल, असे कुणालाही वाटले नव्हते. याचप्रमाणे कसोटीमध्ये गावस्करांच्या विक्रमाइतकी ३४ शतके कुणी झळकावू शकेल, असेही वाटले नव्हते. हा विक्रम पन्नास वष्रे तरी अबाधित राहील, असेच वाटत होते. पण थोडय़ाच वर्षांत सचिनरूपी नवा मास्टर-ब्लास्टर आपल्याला मिळाला. त्याने हा विश्वविक्रम मोडीत काढला. सचिनइतकी उंची गाठणे खूप कठीण आहे, पण मुंबईतून नवा तारा निश्चितच आपल्याला मिळेल अशी आशा राखू.’’
महावीर नगरातील जिमखान्याला
सचिनचे नाव देण्यास महापौरांची संमती
मुंबई:कांदिवलीमधील महावीरनगरातील मुंबई महापालिकेच्या भूखंडावर मुंबई क्रिकेट क्लबने उभारलेल्या जिमखान्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव देण्यास महापौरांनी हिरवा कंदिल दाखविला.महापालिकेला डावलून महावीर नगरातील जिमखान्याला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याचा निर्णय परस्पर घेणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी सभागृह नेते यशोधर फणसे यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे मंगळवारी केली होती. मात्र बुधवारी महापौरांनी सचिनच्या नावाला अनुकूलता दाखवली. सुनील प्रभू म्हणाले की, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी सावंत यांनी पत्र देऊन जिमखान्याला सचिनचे नाव देण्याची विनंती केली आहे.
गटनेत्यांची मंजुरी मिळताच याबाबतचा प्रस्ताव पालिका सभागृहात सादर केला जाईल. मंजुरी मिळताच तो पुढील कारवाईसाठी आयुक्तांकडे जाईल. सचिनच्या नावाला शिवसेनेचा विरोध नाही असे प्रभू यांनी स्पष्ट केले.या भूखंडावरील जिमखान्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तो पालिकेला हस्तांतरित करावा लागणार आहे.