मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने धावांचे इमले बांधत क्रिकेट रसिकांना अमाप सुख दिले, डोळ्यांची पारणे फेडली. पण कोलकात्यातील १९९ व्या सामन्याच्या पहिल्या दिवशी सचिन फलंदाजीला आला नसला तरी त्याने चाहत्यांची मने जिंकली ती गोलंदाजीने. जिथे आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांना चेंडू वळवता येत नव्हते तिथे सचिनने हातभर चेंडू वळवत साऱ्यांनाच बोटे तोंडात घालायला लावली. फिरकीपटूंना खास कामगिरी करता येत नाही, हे पाहून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सचिनच्या हाती चेंडू सुपूर्द केला. जेव्हा सचिन गोलंदाजीसाठी आला तेव्हा ईडन गार्डन्स सचिन.. सचिन या नादाने दुमदुमले होते. सचिनच्या नावाचे फलक मुखवटे हवेत झुलत होते. सचिननेही या वेळी आपल्या चाहत्यांना निराश न करता दोन षटकांमध्ये अवघ्या पाच धावा देत शिलिंडफोर्डला पायचीत पकडले आणि स्टेडियम सचिनमय झाले. सचिनने हा आपल्या कारकिर्दीतील २०१ वा बळी मिळवला असून कसोटी क्रिकेटमधील ४६ वा बळी आहे. १९९३ साली हीरो चषकाच्या उपांत्य फेरीचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना सचिनने गोलंदाजीच्या जोरावर भारताला जिंकवून दिला होता.

Story img Loader