शुक्रवारचा दिवस उजाडला तोच मुंबईकरांच्या मनात एक आशा आणि धाकधूक घेऊन. मोहरमची सुटी आणि वानखेडेवर सचिनच्या फलंदाजीचा योग चांगलाच जमून आला. सकाळी सकाळी लोक टीव्हीसमोर ‘देवदर्शना’साठी बसले, तर वानखेडेवर ‘सहस्रनामा’चा जप सुरू झाला. श्रीकृष्णाची रासलीला पाहण्यासाठी देव-गंधर्व आकाशात जमायचे तसे ‘सचिनदेवा’ची ‘रनलीला’ याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी बॉलीवूडपासून राजकारणातील तारकामंडळ स्टेडियमवर जमले होते. ‘सचिनदेवा’ने धावांची पन्नाशी ओलांडताच वातावरणात एक नवा उत्साह संचारला, एकेक धाव शतकाच्या दिशेने पडू लागली आणि आपण एका ऐतिहासिक अनुभवाचे साक्षीदार ठरणार या उत्कंठेने सारेच उल्हसित झाले.. पण एका निसटत्या क्षणात, अचानक वळलेल्या त्या चेंडूने सचिनची विकेट घेतली आणि सारेच सुन्न झाले..
नाबाद आणि नव्या फॉर्मात मैदानावर आलेला सचिन शतक झळकावणार अशी नवी आशा घेऊनच शुक्रवारची सकाळ उगवली. छान हवा, कोवळे ऊन अशा प्रसन्न वातावरणात सचिनदेवाचे शतक निर्वेध पार पडण्याचे संकेत मिळत होते. सचिनदेवाची ही रंगलेली ‘रनलीला’ पाहण्यासाठी दिल्लीहून राहुलबाबाही आले.. मुख्यमंत्री पृथ्वीराज आले.. आमिर खान कालचाच टी शर्ट घालून परत हजर झाला.. हृतिकही अवतरला. एकीकडून टिनो बेस्टच्या उसळणाऱ्या चेंडूंचा शांत आणि संयमाने सामना करणाऱ्या सचिनने शुक्रवारी सहा लक्षवेधी चौकार खेचले. कारकिर्दीतील ६८वे अर्धशतक ठोकल्यानंतर सचिन पाऊणशेच्या घरात पोहोचला. तो शतक ठोकणार, या कल्पनेनेच वानखेडेवरील चैतन्य चतुष्पटीने वाढले. पण तितक्यात घात झाला, गर्रकन आलेल्या चेंडूने सचिनच नव्हे तर साऱ्यांच्याच मनातला उत्साहच बाद झाला. क्षणभर काय झाले कुणालाच समजेना.. काय करावे हेही कळेना.. सन्नाटा इतका की वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनाही जल्लोष करावासा वाटू नये. पॅव्हेलियनकडे परतणाऱ्या सचिनला अवघ्या स्टेडियमने उभे राहून टाळय़ांच्या कडकडाटात अभिवादन केले. दोन संदेश या वातावरणाची भावुकता वाढवत होते. ‘२४ वर्षांच्या मनोरंजनासाठी धन्यवाद’ असं सांगणारा स्टेडियमवरील डिजिटल फलक आणि समालोचक सुनील गावसकर यांचे शब्द.. ‘थँक्यू, थँक्यू, थँक्यू..!’
सचिन परतल्यानंतरही भारतीय संघाचा धावफलक छान होता.. पुजाराने शतक झळकावले.. मुंबईच्याच रोहितनेही झळकावले.. पण त्यात कुणाचेच मन लागेना. ‘आहे मनोहर परि गमते उदास’ अशी प्रत्येकाची अवस्था होती.
आजच अखेरचा दिवस?
दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचे तीन विकेट गेले असून त्यांचा आजच्या, शनिवारच्या दिवसातच पराभव होणार, असे दिसत आहे. त्यामुळे सचिनला दुसऱ्या डावात फलंदाजीला पाहण्याची आशा लावून बसलेल्यांचा हिरमोड होणार आहे. सामना शनिवारीच संपल्यास, आपल्या लाडक्या ‘तेंडल्या’ला दोन दिवस आधीच निरोप देण्याची वेळ रसिकांवर ओढवणार आहे.
*११३ कारकिर्दीतील पाचवे शतक झळकवताना चेतेश्वर पुजाराने १२ चौकार लगावले.
*१११* पदार्पणानंतरच्या सलग दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माने शानदार नाबाद शतक ठोकले.
*सकाळी १०:३८ देवनरिनच्या अचानक बाहेर वळलेल्या चेंडुला सचिनने कट केला. पण तो डॅरेन सॅमीने स्लिपमध्ये झेलला.
सचिनची कसोटी कारकीर्द
२०० सामने, १५,९२१ धावा, ५१ शतके, ६८ अर्धशतके, ५३.७१ सरासरी
गमते उदास…
शुक्रवारचा दिवस उजाडला तोच मुंबईकरांच्या मनात एक आशा आणि धाकधूक घेऊन. मोहरमची सुटी आणि वानखेडेवर सचिनच्या फलंदाजीचा योग
First published on: 16-11-2013 at 12:22 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin tendulkars 200th test and hes out spectators becomes sentimental