ज्या परिस्थितीमधून तो आला त्याची पुरेपूर जाणीव ठेवत आता खेळणाऱ्या युवा खेळाडूंच्या आशेवर विरजण पडू नये, यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) काही महत्त्वाच्या सूचना आपल्या सत्कारानंतर बोलताना व्यक्त केल्या. सकाळी घरून निघताना युवा खेळाडूच्या मनात संघातून खेळण्याची आशा असते, पण सध्याच्या आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या स्वरूपाचा विचार करता प्रत्येकाला सामना खेळता येत नाही आणि त्या खेळाडूने मनाशी बाळगलेल्या आशा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे मी एमसीएला अशी सूचना करू इच्छितो की, या स्पर्धेमध्ये ११ ऐवजी १५ खेळाडूंना खेळता यावे आणि प्रत्येक खेळाडू तीन सामने कसे खेळेल, याकडे पाहावे व याचा तोडगा एमसीएने काढायला हवा, असे सत्कारमूर्ती सचिनने आपल्या भाषणामध्ये सांगितले.
यापुढे सचिन म्हणाला की, ‘‘माझा मुलगा अर्जुन क्रिकेट खेळतो, म्हणून मी हे असे सांगत नाही. तो क्रिकेटमध्ये यशस्वी झाला किंवा अपयशी ठरला तरी माझा त्याला नेहमीच पाठिंबा राहील. पण काही जणांना क्रिकेटचे वेड असते, त्यासाठी ते घरही सोडायला तयार असतात. त्यांच्यासाठी क्रिकेट सर्वस्व असतं, पण प्रत्येकाच्या घरी क्रिकेटला पोषक वातावरण असतं, असंही नाही. त्यामुळे अशा युवा खेळाडूंना संधी मिळाली नाही, तर त्यांचे खच्चीकरण होऊ शकते. त्यामुळे त्यांना संधी मिळायला हवी. कारण संधी न मिळता तो क्रिकेटबाहेर फेकला गेला तर ते वाईट होईल आणि संधी मिळून त्याला काही करता आले नाही तर क्रिकेट सोडण्याचे ते कारण ठरू शकते. त्यामुळे हा एमसीएला माझा संदेश असेल.
या वेळी एमसीएकडून शाल, श्रीफळ आणि खास चित्र देऊन सचिनचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर वांद्रे-कुर्ला संकुलातील इनडोअर क्रिकेट अकादमी आणि रीक्रिएशन सेंटरला शरद पवार यांचे नाव या वेळी देण्यात आले, ज्याचा उद्घाटन सोहळा सचिनच्या हस्ते करण्यात आला. या वेळी हॅरिस शिल्ड क्रिकेट स्पर्धेमध्ये ५४६ धावा करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि कांगा लीग स्पर्धेत आठव्या वर्षी पदार्पण करत २५ विकेट्स मिळवणाऱ्या मुशीर खानचाही सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कांग लीगमधील ‘ए ते जी’ गटांमधील विजेत्यांचा, उपविजेत्यांचा आणि सर्वोत्तम फलंदाज जय बिश्ता व सर्वोत्तम गोलंदाज आशीष गावंड यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी सचिनचे प्रशिक्षक आणि द्रोणाचार्य पुरस्कारविजेते रमाकांत आचरेकर यांचा ८१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी सचिनने त्यांना केक भरवत, त्यांचे आशीर्वाद घेतले.
या सोहळ्याचे औचित्य साधून एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला नवीन पिढी घडवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, सचिन तू तुझ्या खेळाने आम्हाला निखळ आनंद दिला, पण आता तू नवीन पिढी घडवण्यासाठी योगदान द्यायला हवे. एमसीएच्या माध्यमातून खेळाची उंची कशी वाढवण्याचा प्रयत्न तू करायला हवास. आताच्या पिढीसाठी तीन आदर्शवत खेळाडू असतील आणि ते म्हणजे सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे.
ते पुढे म्हणाले की, मी काही खेळाडू नाही, पण माझी ‘विकेट’ २७ व्या वर्षीच लग्न केले तेव्हा गेली. पण क्रिकेटव्यतिरिक्त अन्य बऱ्याच खेळांचा प्रशासक म्हणून मी काम पाहत आहे. चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आमचे काम आहे आणि यापुढेही अविरतपणे हा वसा आम्ही जोपासण्याचा प्रयत्न करू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा