‘‘सचिन तेंडुलकरचा हा अखेरचा सामना वानखेडेवर त्याच्या घरच्या मैदानात असल्याने त्याच्यावर फार दडपण होते. नेहमीप्रमाणेच या सामन्यासाठी त्याने कसून सराव केला होता. पण जेव्हा आम्ही मैदानात उतरलो, तेव्हापासून प्रेक्षकांनी सचिनच्या नावाने स्टेडियम दणाणून सोडले होते. तो फलंदाजीला यायचा तेव्हा प्रेक्षकांचा आवाज टिपेला जायचा, पण या परिस्थितीतही त्याने ज्याप्रकारे एकाग्रचित्ताने फलंदाजी केली ती थक्क करणारीच होती,’’ असे वानखेडेवर सलग दुसरे शतक झळकावणाऱ्या चेतेश्वर पुजाराने पत्रकार परिषदेत सांगितले.
सचिनबद्दल तो म्हणाला की, ‘‘सचिनने आम्हा युवा खेळाडूंना भरपूर काही दिले आहे. प्रत्येक वेळी तो आमच्यासाठी मदतीला धावत असतो. या सामन्यातही जेव्हा माझे चित्त विचलित होत होते, तेव्हा त्याने एकाग्रता कशी राखावी, यासाठी मार्गदर्शन केले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सचिनची खेळी सर्वोत्तम होती. तो जेव्हा बाद झाला तेव्हा मी नक्कीच निराश झालो.’’
स्वत:च्या खेळीबद्दल चेतेश्वर म्हणाला की, ‘‘खेळपट्टी ही फलंदाजांबरोबरच गोलंदाजांसाठीही अनुकूल होती, कारण दोघांनाही खेळपट्टीची मदत मिळत होती. मैदानात गेल्यावर फक्त फलंदाजीचाच विचार करत होतो. या डावात शतक झाल्याने आनंदी असलो तरी समाधानी नाही, कारण मी लवकर बाद झालो. यापेक्षा नक्कीच अधिक धावा मला काढता आल्या असत्या.’’

Story img Loader