मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कारकिर्दीतील अखेरच्या २००व्या क्रिकेट कसोटी सामन्यादरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रा. प्रफुल्ल सावंत यांनी रेखाटलेल्या विशेष चित्राची भेट देण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला चित्राची भेट देण्यासाठी आपली निवड केल्याचे कळल्यापासून नाशिकच्या चित्रकला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रफुल्ल सावंत यांना जणूकाही आकाशच ठेंगणे झाले आहे.
आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या चित्रांचा गौरव झाला असून त्यापेक्षा सचिनचे चित्र रेखाटण्याचा बहुमान आपल्यासाठी मोलाचा असल्याची भावना प्रा. सावंत यांनी व्यक्त केली. ‘‘पवार यांनी या विशेष सोहळ्यासाठी माझी निवड करणे, हे आपल्या कलेचे योग्य मूल्यमापन झाल्याचे वाटते. सचिनकडे आपण रेखाटलेली पाच ते दहा चित्रे निरीक्षणासाठी पाठविण्यात आली असून त्यात माझे भाऊ प्रा. राजेश सावंत यांनी काढलेल्या काही चित्रांचाही समावेश आहे. या चित्रांपैकी बहुदा एक किंवा त्याव्यतिरिक्त सचिन जे सांगेल ते चित्र त्याला भेट म्हणून देण्यात येणार आहे. सचिनकडे जी चित्रे पाठविण्यात आली आहेत, त्यात त्याच्या कारकिर्दीशी तसेच स्वभावाशी साम्य असणाऱ्या चित्रांचा समावेश आहे,’’ असेही सावंत यांनी सांगितले.
‘‘सचिनची सर्व जडणघडण मुंबई, महाराष्ट्रात झाली. त्यामुळे मुंबईशी साधम्र्य साधणारी चित्रे त्याच्याकडे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय नाशिकचा गोदाघाट, वाईजवळील नानासाहेब फडणवीसांचा वाडा यासारख्या चित्रांचाही त्यात समावेश आहे. या चित्रांपैकी एक सचिनला पसंत पडेल,’’ अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सावंत यांना राज्य ते राष्ट्रीय स्तरावर ४० तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रकला क्षेत्रातील नामांकित अशा कला संस्थांचे १७ पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
चहा बनविण्यातही सचिन पारंगत – हिरवाणी
नागपूर : फलंदाजीत अनेक विक्रमांची शिखरे ओलांडणारा सचिन तेंडुलकर हा चहा बनविण्यातही पारंगत आहे, असा खुलासा भारताचे माजी फिरकी गोलंदाज नरेंद्र हिरवाणी यांनी सांगितले. सचिनबरोबर अनेक दौऱ्यांमध्ये भाग घेण्याची संधी मला मिळाली असे सांगून हिरवानी म्हणाले, ‘‘गेली २४ वर्षे आमच्यात मैत्रीचे चांगले नाते आहे. न्यूझीलंड दौऱ्यात आम्हा दोघांना एकत्र खेळण्याची संधी मिळाली. त्या वेळी सचिनचा खेळ व स्वभाव अगदी जवळून पाहिला आहे. या दौऱ्यात आम्ही एकाच खोलीत राहात होतो. त्या वेळी माझ्यासाठी तो चहा तयार करून ठेवीत असे व त्यानंतर मला उठवत असे. त्याने या दौऱ्यातील ७२ दिवसांपैकी ६२ दिवस माझ्यासाठी चहा बनवला होता. सचिन हा मुलखावेगळा खेळाडू आहे. चालता-बोलता तो क्रिकेटच जगत असतो. न्यूझीलंड दौऱ्यात मोकळ्या वेळी तो स्वत:ची बॅट स्वच्छ करीत असे किंवा एकटाच बॅटीने चेंडू मारण्याचा सराव करीत असे.’’
रोहतक लढतीसाठी सचिनच्या निवासाचा प्रश्न
नवी दिल्ली : कारकिर्दीतील अखेरच्या २००व्या सामन्यासाठी सराव म्हणून सचिन तेंडुलकर मुंबईकडून हरयाणाविरुद्धच्या रणजी सामन्यत खेळणार आहे. हा सामना लाहिली, रोहतक या छोटय़ाशा गावी होणार असल्यामुळे महान फलंदाज आणि राज्यसभेचा खासदार असलेल्या सचिनच्या निवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रोहतकमध्ये द्वितीय, तृतीय, पंचतारांकित दर्जाचे हॉटेल नाही. हॉटेलमध्ये पंधरापेक्षा अधिक खोल्या नाहीत. काही रिसॉर्ट्स आहेत मात्र त्यातही पुरेश्या खोल्या नाहीत. सचिन खासदार असल्याने त्याच्या सुरक्षेची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. सचिनसह संपूर्ण संघ आणि अन्य कर्मचारी एकत्र राहतील असे हॉटेल नसल्याने आयोजकांपुढे समस्या निर्माण झाली आहे. अपवादात्मक परिस्थितीत हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या निवासस्थानी सचिनची राहण्याची व्यवस्था होऊ शकते.