आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये यशाच्या सर्वोच्च शिखरावर असतानाच निवृत्त होणे कोणत्याही खेळाडूसाठी योग्य असते. प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत निवृत्ती अटळ असते. आता खेळातून दूर हो, असे म्हणण्याची कोणावर वेळ येऊ नये, असे माझे मत आहे. त्यामुळेच सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या एव्हरेस्ट शिखरावर असताना निवृत्ती जाहीर करीत योग्यच निर्णय घेतला आहे.
एका खेळाडूची तुलना दुसऱ्या खेळाडूशी करणे अयोग्य असते. ज्याची-त्याची शैली वेगवेगळी असते, तरीही तो आपल्या देशासाठी व संघासाठी महत्त्वाचा वाटा उचलत असतो. त्यामुळेच सचिनची जागा दुसरा कोणी घेऊ शकणार नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. अनेक युवा खेळाडू त्याचा वारसा चालविण्याच्या उंबरठय़ावर आहेत. सचिनइतकी महानता कदाचित त्यांच्याकडे नसेल. परंतु सचिनप्रमाणेच संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे अनेक युवा खेळाडू भारताकडे असतील. या युवा खेळाडूंनी आपण सचिनचा वारसा पुढे चालविणार आहोत, हे मनात ठेवत सचिनसारखी जिद्द, संयम, चिकाटी, आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  
सचिनची मी खूप चाहती आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्रित भाग घेतला आहे. क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांच्या वेळी सामनावीर पारितोषिक देण्याची संधी मला मिळाली आहे. त्या वेळीही सचिनबरोबर संवाद साधण्याची संधी मी सोडली नव्हती. त्याच्याकडे कमालीचा विनय आहे आणि नेहमीच तो विनम्रपणे वागतो. जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्याला स्थान असले, तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत, हे मला आवर्जून सांगावेसे वाटते.
समोरची व्यक्ती लहान असो किंवा मोठी असो, त्याच्याकडून काही ना काही तरी शिकण्याची सचिनची वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे. जीवनात शेवटपर्यंत शिकण्यासारखे काहीतरी असते, असे मानणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिनची गणना केली जाते. सचिन हा नेहमीच स्वत:ला विद्यार्थी मानत आला आहे. त्याच्या या स्वभावामुळेच तो महान खेळाडू होऊ शकला.
क्रिकेटचा संपूर्ण सामना पाहण्याइतका वेळ मी देऊ शकत नाही. त्यामुळे कधी कधी ट्वेन्टी-२० सामन्यांचा मी आनंद घेते. त्यातही सचिन खेळत असेल, तर मी टीव्हीपासून दूर जात नाही. सचिनची फटके मारण्याची शैली सतत पाहतच राहावी, अशीच असते. सचिनने निवृत्तीनंतर नवोदित खेळाडूंना क्रिकेटचे धडे देण्याचे काम करावे, अशी माझी मनोमन इच्छा आहे. क्रिकेटमध्ये देशाचे स्थान सदोदित उच्च स्थानावर राहण्यासाठी भारताला सचिनसारख्या अनेक खेळाडूंची आवश्यकता आहे. हे कार्य सचिन करील, असा मला विश्वास वाटतो.