निवृत्तीचा निर्णय कोणत्याही खेळाडूसाठी सोपा नसतो. पण सचिन तेंडुलकरच्या एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचे चक्र गेल्या ७२ तासांमध्ये फिरले. नागपूरच्या कसोटी सामन्यानंतर सचिनने निवृत्तीचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
नागपूरच्या कसोटी सामन्यानंतर सचिन मुंबईला आला आणि त्यानंतर त्याने कुणाशीही संपर्क न साधण्याचे ठरवले, त्याने त्याचा भ्रमणध्वनीही या वेळी तीन दिवसांसाठी बंद केला होता, असे सचिनच्या एका जवळच्या मित्राने सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिनने त्याच्या कुटुंबीयांना आणि खास मित्रांना शुक्रवारी रात्री निवृत्तीचा निर्णय कळवला. त्यानंतर शनिवारी रात्री त्याने हा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) एन. श्रीनिवासन यांना कळवला. या वेळी त्याने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात खेळणार नसल्याचेही स्पष्ट केले.
सचिनने कसोटी क्रिकेटबाबत काही निर्णय घेतला आहे का, असे विचारल्यावर सूत्रांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर सचिन आपल्या कामगिरीचा आढावा घेईल आणि त्यानंतरच निर्णय घेईल. त्याने जर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत चांगली कामगिरी केली, तर २०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी तो दक्षिण आफ्रिकेत जाईल.
सचिनच्या निर्णयाबद्दल बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे म्हणाले की, सचिनने निवृत्तीचा निर्णय घाईमध्ये घेतलेला नाही. संघनिवडीपूर्वीच त्याने आम्हाला निवृत्तीविषयी सांगितले होते. 

Story img Loader