काश्मीरच्या कूपवाडा येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक शनिवारी भारतीय लष्करात दाखल झाल्या. वीरपत्नीच्या जिद्दीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सलाम केलाय. महाराष्ट्रासह संपूर्ण देश स्वाती महाडीक यांच्या जिद्दीला सलाम करत असताना, सचिन तेंडुलकरने ट्विटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या. सचिनने ट्विटरवर लिहिलंय की, “देशातील दोन महिलांनी शूरवीर पती गमावल्यानंतर देशसेवेचा निर्धार केला. स्वाती महाडिक आणि निधी मिश्रा यांच्या धाडसी निर्णयाचा मला आदर आहे. जय हिंद” या ट्विटसोबत त्याने स्वाती आणि निधी यांच्यासंदर्भातील बातम्यांचे काही फोटोही पोस्ट केले आहेत.

स्टाफ सिलेक्शनची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वाती महाडिक यांनी ११ महिन्यांचे खडतर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर चेन्नईत ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत (ओटीए) पार पडलेल्या दीक्षांत समारंभात त्या लेफ्टनंटपदी रुजू झाल्या. शहीद संतोष महाडिक यांच्या निधनानंतर स्वाती यांनी लष्करात सेवा करण्याचा निर्धार केला. पुणे विद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या स्वाती यांना लष्कर व संरक्षणमंत्र्यांनी फक्त वयाच्या अटीत सूट दिली होती. आपल्या मुलांना शिक्षणासाठी बोर्डिंगमध्ये ठेवून स्वाती यांनी स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेची तयारी केली. अथक परिश्रमानंतर पहिल्याच प्रयत्नात त्या परीक्षा उत्तीर्णही झाल्या. यानंतर बंगळुरू येथे त्यांनी वैद्यकीय आणि शारीरिक चाचणी यशस्वीपणे पार केली. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्वाती यांची चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीसाठी (ओटीए) निवड झाली.