क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकर दोनशेव्या कसोटीनंतर निवृत्त होत आहे. गेल्या अडीच दशकांपासून क्रिकेटच्या क्षितिजावर तळपणारा हा तारा आता अस्तंगत होणार असला तरी त्याचा मुलगा अर्जुन याच्या रुपाने नव्या ताऱ्याचा उदय होणार आहे. वानखेडेवर मंगळवारी भारतीय संघाच्या सरावाच्या वेळी १३ वर्षीय अर्जुनची उपस्थिती त्यामुळेच डोळय़ांत भरणारी होती. नेटमध्ये अर्जुनने भारतीय फलंदाजांवर आपली गोलंदाजी आजमावली. या संपूर्ण सराव सत्रात सचिन त्याला वारंवार कानमंत्र देत होता. याप्रमाणे भारतीय संघातील दिग्गजांनीही त्याला सल्ले दिले.
वानखेडेवर अभूतपूर्व बंदोबस्त
कसोटी सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दोन अतिरिक्त पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, ३५ पोलीस निरीक्षक, ९० पोलीस उपनिरीक्षक, ८५० पोलीस कर्मचारी, २५० महिला पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सहा बॉम्ब शोधक आणि बॉम्बनाशक पथक, १२ शीघ्र कृती दल तैनात करण्यात आला आहेत. स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी एकूण सात प्रवेशद्वार असून ४५ डोर मेटल डिटेक्टर आणि १०० हॅण्ड मेटल डिटेक्टरचा वापर केला जाणार आहे.

Story img Loader