मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड मुंबई संघासाठी (१९ वर्षाखालील) करण्यात आली आहे. अर्जुन बडोदा या ठिकाणी होणाऱ्या जे. वाय. लेले ऑल इंडिया वन डे टुर्नामेंटमध्ये भाग घेणार आहे. याआधी अर्जुन तेंडुलकर मुंबईच्या १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील संघातून खेळला आहे. आता तो मुंबईच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघातून खेळणार आहे. या संघात निवड होणे ही अर्जुन तेंडुलकरसाठी महत्त्वाची संधी आहे. तो आता बडोत्यातील स्पर्धेत कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जे.वाय. लेले. टुर्नामेंट १६ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर पर्यंत खेळली जाणार आहे.

अर्जुन तेंडुलकर गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये जलदगती गोलंदाजीचे धडे गिरवत होता. जलदगती गोलंदाजी कशी करायची? त्यातील बारकावे काय? याचा त्याने सखोल अभ्यास केला आहे. १४ वर्षांखालील आणि १६ वर्षांखालील गटात खेळताना अर्जुन तेंडुलकरने् चांगली कामगिरी केली आहे.

इंग्लंडमध्ये असताना अर्जुन तेंडुलकरने जॉनी बेअरस्टो या फलंदाजाला असा यॉर्कर चेंडू टाकला की तो कसा खेळावा याचे उत्तर जॉनीकडेही नव्हते. अर्जुनच्या यॉर्कर गोलंदाजीवर बेअरस्टोच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, त्यानंतर अर्जुनचं सर्वत्र कौतुक झालं होतं. आता बडोद्यात होणाऱ्या एक दिवसीय सामन्यांच्या टूर्नामेंटमध्ये अर्जुन कशी कामगिरी करतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

असा असेल ‘मुंबई अंडर १९’ संघ
अग्नी चोप्रा, दिव्येश सक्सेना, भुपेन ललवाणी, अंजदीप लाड, सागर छाब्रिया, सोहेब खान, सत्यलक्ष जैन, वेदांत मुरकर, ध्रुव ब्रिद, तनुष कोटियन, नकुल मेहता, फरहान काझी, अथर्व अंकोलेकर,अभिमन्यू वसिष्ठ, अर्जुन तेंडुलकर, सक्षम पराशर, सक्षम झा, सिल्व्हेस्टर डिसुझा