Arjun Tendulkar on NCA Training: सचिन तेंडुलकरचा पूत्र अर्जुन याला मुंबई इंडियन्सने पदार्पणाची संधी दिली होती. लवकरच सर्वोच्च स्तरावर खेळण्यासाठी तयार होत असलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) २० आश्वासक अष्टपैलू खेळाडूंना बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे तीन आठवड्यांच्या शिबिरासाठी बोलावले आहे. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा समावेश आहे, जो गोव्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला होता, ज्याने इंडियन प्रीमियर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्स साठी पदार्पण केले होते.
बोर्डाच्या एका वरिष्ठ सूत्राने पीटीआयला सांगितले की, “इमर्जिंग आशिया कप (२३ वर्षांखालील) या वर्षाच्या शेवटी होणार आहे आणि बीसीसीआय तरुण खेळाडूंचा शोध घेत आहे. अष्टपैलू खेळाडूंचे शिबिर NCA चे क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी सुचवले होते, जेणेकरून आम्हाला सर्व प्रकारातील अष्टपैलू क्रिकेटपटू शोधता येतील.
चेतन साकारिया आणि अभिषेक शर्मा या खेळाडूंचा देखील समावेश
पीटीआयच्या म्हणण्यानुसार, शिव सुंदर दास यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीने कामगिरी आणि क्षमतेच्या आधारे खेळाडूंची निवड केली. सूत्राने सांगितले की, “शिबिरात सहभागी प्रत्येक खेळाडू पूर्ण अष्टपैलू नाही. काही गोलंदाजी अष्टपैलू असतात तर काही फलंदाजी अष्टपैलू असतात. त्यांचा उद्देश त्यांच्यातील प्रतिभा वाढवणे आणि त्यांना टीम इंडियात खेळण्यासाठी तयार करणे हा आहे.” यामध्ये चेतन साकारिया, अभिषेक शर्मा, मोहित रेडकर, मानव सुतार, हर्षित राणा, दिविज मेहरा या खेळाडूंचा समावेश आहे.
अर्जुन तेंडुलकरच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
अर्जुन तेंडुलकरने तीन आयपीएल सामने खेळले असले तरी तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्याच्या निवडीमागील कारणाबद्दल विचारले असता, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले की, “अर्जुनने यापूर्वीच रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकावले आहे. डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा निवड समिती शोध घेत आहे. अर्जुन १३० ते १३५ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतो आणि चांगली सहाव्या क्रमांकावर चांगली फलंदाजीही करतो. त्याच्याकडे वैविध्य आहे, पण देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी लक्षात घेऊन त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येईल?”
बीसीसीआयचे अधिकारी पुढे म्हणाले, “निवड केवळ आकडेवारीवर आधारित नाही तर क्षमतेच्या आधारेही केली जाते. अर्जुन २३ वर्षांचा आहे आणि त्याला डेव्हलप होण्यासाठी वेळ मिळाला आहे, असे या समितीला वाटते. अन्यथा त्यांनी त्याला निवडले नसते. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सात सामन्यांत १२ विकेट्स घेतल्या आहेत, त्याच्या कौशल्यावर कुठलीही शंका नसली तरी प्रशिक्षक त्यावर काम करतील. गोवा क्रिकेट असोसिएशननेही तेंडुलकर ज्युनियरला एनसीए शिबिरासाठी आमंत्रित केल्याची पुष्टी केली आहे.”