भारतीय क्रिकेटर आर अश्विनला बंदीपासून वाचवण्यासाठी सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून देर ठेवण्यात आल्याचा दावा पाकिस्तानचा माजी गोलंदाज सईद अजलमनले केला आहे. गोलंदाजीच्या संशयास्पद शैलीमुळे आयसीसीकडून बंदी घालण्यात येऊ नये आणि शैली सुधारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी आर अश्विनला क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आल्याचं सईद अजमलचं म्हणणं आहे. Cricwick ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केलं आहे. चुकीच्या शैलीमुळे सईद अजमलला आयसीसीकडून बंदीचा सामना करावा लागला होता.

सईद अजमलने यावेळी फलंदाज आणि जलद गोलंदाजासांठी काही नियम त्यांच्या बाजूने असताना फिरकी गोलंदाजांसाठी कडक नियम असल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्याने आयसीसीच्या १५ डिग्रीत कोपरा वळवणाच्या नियमावरही टीका केली आहे. आर अश्विनला बंदीचा सामना करावा लागू नये यासाठीच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर ठेवण्यात आलं असं त्याने पुढे म्हटलं आहे.

“हे नियम तुम्ही कोणालाही न विचारता बदलता. मी आठ वर्ष क्रिकेट खेळत होतो. ते सर्व नियम माझ्यासाठी लागू होत होते. एवढंच म्हणायचं आहे,” अशी खंत सईद अजमलने व्यक्त केली आहे.

“अश्विन सहा महिने क्रिकेटपासून दूर होता. पण कशासाठी? कारण तुम्ही तुमच्या गोलंदाजावर मेहनक घ्याल जेणेकरुन त्याच्यावर बंदी येऊ नये,” असं यावेळी त्याने सांगितलं. सईद अजमलने यावेळी पाकिस्तानी गोलंदाजावर बंदी आल्याची कोणाला चिंता नसून, त्यांना फक्त पैशांची काळजी असल्याचंही म्हटलं आहे.

दरम्यान नुकतंच अश्विनने १५ डिग्रीच्या कोपरा वळवणाच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यासंबंधी आयसीसीकडे मागणी केल्याचं वृत्त फेटाळलं आहे. दुसरा टाकताना १५ डिग्री कोपरा वळणाच्या नियमामुळे अडथळा येत असल्याचे तक्रार त्याने केली असल्याचं सांगण्यात आलं होतं. यावेळी त्याच्या युट्यूब चॅनेलवर त्याने हे वक्तव्य केल्याचं सांगत हे वृत्त देण्यात आलं होतं.

आर अश्विनने ट्विट करत कृपया चुकीची माहिती देऊ नका अशी विनंती केली होती. आपलं युट्यूब चॅनेल लोकांना क्रिकेटची अजून माहिती मिळावी यासाठी असून भाषांतर जमत नसेल तर कृपया असं वृत्त देऊ नका असंही त्याने फटकारलं होतं.

आर अश्विनने ७८ कसोटी सामन्यांमध्ये ४०९ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने ३० वेळा पाच विकेट्स तर सात वेळा १० विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपमध्ये आर अश्विन पुन्हा मैदानात दिसण्याची शक्यता आहे.

Story img Loader