अग्रमानांकित बी. साईप्रणीत व तृतीय मानांकित पी. सी. तुलसी यांनी व्ही. व्ही. तथा दाजीसाहेब नातू चषक अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेतील अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राच्या प्रज्ञा गद्रे हिने दुहेरी मुकुट मिळविला.
मॉडर्न बॅडमिंटन संकुलात झालेल्या या स्पर्धेत पेट्रोलियम मंडळाचा खेळाडू साईप्रणीत याने अंतिम फेरीत किदम्बी श्रीकांत या आंध्र प्रदेशच्या खेळाडूला २१-१७, २१-१८ असे हरविले. श्रीकांत याने नुकतीच थायलंड ओपन स्पर्धा जिंकली होती. साईविरुद्धच्या सामन्यात त्याला अपेक्षेइतका खेळ करता आला नाही. दुसऱ्या गेममध्ये त्याच्याकडे ११-९ अशी आघाडीही होती मात्र त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. साईने या गेममध्ये ९-११ अशा पिछाडीवरू न ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला व आघाडी घेतली. श्रीकांतचे दोन-तीन फटके नेटमध्ये गेले त्याचाही फायदा साईला मिळाला. दुहेरीत तृतीय मानांकित मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी यांनी द्वितीय मानांकित तरुण कोना व अरुण विष्णू यांच्यावर २१-१२, २१-१४ अशी मात केली. दोन्ही गेम्समध्ये अत्री व रेड्डी यांनी खेळावर नियंत्रण राखले होते.
महिलांच्या एकेरीत तुलसी या केरळच्या खेळाडूस विजेतेपदाकरिता फारसे कष्ट घ्यावे लागले नाही. तिची प्रतिस्पर्धी पुण्याची सायली गोखले हिने पहिल्या गेममध्ये दुखापतीमुळे सामना सोडून दिला त्यावेळी तुलसीकडे ५-१ अशी आघाडी होती. उपांत्य फेरीत सायली हिने पुण्याचीच खेळाडू आदिती मुटाटकर हिची अनपेक्षित विजयाची मालिका २१-१३, १७-२१, २१-९ अशी खंडित केली. अन्य लढतीत तुलसीने महाराष्ट्राच्या तन्वी लाड हिच्यावर २१-१५, २१-२३, २१-६ अशी मात केली.
महिलांच्या दुहेरीत प्रज्ञा गद्रे व अश्विनी पोनप्पा यांनी एन. सिकी रेड्डी व अपर्णा बालन यांना २१-९, १३-२१, २१-१७ असे पराभूत केले. प्रज्ञा व अश्विनी यांची आगामी जागतिक स्पर्धेतील महिला दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. प्रज्ञाने मिश्र दुहेरीत अक्षय देवलकर याच्या साथीने विजेतेपद मिळविले. त्यांनी अंतिम फेरीत तरुण कोना व अश्विनी पोनप्पा यांचा ९-२१, २१-१८, २१-१४ असा पराभव केला. पहिला गेम गमावल्यानंतर प्रज्ञा व अक्षय यांनी खेळावर नियंत्रण मिळवित सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. दुसरा गेम घेत त्यांनी सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. तिसऱ्या गेममध्येही त्यांनी वर्चस्व ठेवीत विजय मिळवला.

Story img Loader