Sai Sudarshan century against Australia A : साई सुदर्शनने ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ संघासाठी शानदार शतक झळकावले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शनने १०३ धावांची दमदार खेळी केली. सुदर्शनच्या दमदार खेळीमुळे भारत अ संघाने दुसऱ्या डावात ३१२ धावा केल्या. देवदत्त पडिक्कलसह साई सुदर्शनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजी चांगलीच फोडून काढली. देवदत्त पडिक्कलने ८८ धावांची खेळी साकारली.
साई सुदर्शनची शतकी खेळी –
या खेळीत सुदर्शनने २०० चेंडूंचा सामना केला, ज्यात ९ चौकारांचा समावेश होता. अशा प्रकारे सुदर्शनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही संघासाठी दमदार फलंदाजी करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले. बऱ्याच दिवसांपासून साई सुदर्शन साई सुदर्शनची बॅट देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांच्या रुपाने आग ओकताना दिसत आहे. आता या खेळीसह त्याने भारतीय संघात आपली दावेदारी आणखी भक्कम केली आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाला विजयासाठी अजून १८६ धावांची गरज –
पहिल्या डावात २१ धावांत स्वस्तात बाद होणाऱ्या साई सुदर्शनने दुसऱ्या डावात दमदार शतक झळकावले. पहिल्या डावात सुदर्शनला ३५ चेंडूत केवळ २१ धावा करता आल्या. सुदर्शन व्यतिरिक्त, देवदत्त पडिक्कलने १९९ चेंडूत ८८ धावा केल्या. भारतीय अ संघ पहिल्या डावात १०७ धावांपर्यंत मर्यादित राहिला होता. याआधी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर भारत अ संघाने ऑस्ट्रेलिया अ संघासमोर २२४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया अ संघाने १ बाद ३९ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी अजून १८६ धावांची गरज आहे.
हेही वाचा – Virat Kohli : विराट कोहलीचा आत्मघातकी रनआऊट, रनमशीनचा वेग कमी पडला अन्… पाहा VIDEO
सुदर्शन आयपीएलमध्येही चमकला होता –
इंडियन प्रीमियर लीगमध्येही साई सुदर्शन खूप लोकप्रिय आहे. गेल्या महिन्यात पार पडलेल्या रिटेन्शमध्ये गुजरात टायटन्सने त्याला त्याला ८.५ कोटी रुपयांची मोठी रक्कम मोजत आयपीएल २०२५ साठी रिटेन केले आहे. सुदर्शनने गेल्या हंगामात आयपीएलमध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती. गेल्या मोसमात त्याने गुजरात टायटन्ससाठी ५०० हून अधिक धावा केल्या होत्या.