सध्या लंडनमध्ये विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी लोकांची मांदियाळी जमल्याचे चित्र आहे. यामध्ये महेंद्रसिंह धोनी, सुनील गावसकर, सौरव गांगुली या सारख्या क्रिकेटपटूंसोबतच काही बॉलिवुड कलाकारांचाही समावेश आहे. हे सर्व सेलिब्रिटी भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यांना आनंद लुटताना दिसत आहेत. मंगळवारी (१२ जुलै) केनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात तर बॉलिवुड अभिनेता सैफ अली खानने आपला मुलगा तैमुरसह हजेरी लावली. विशेष म्हणजे तैमुरने आपला पहिला क्रिकेट सामना एमएस धोनी आणि गॉर्डन ग्रीनिज या दिग्गजांसोबत बघितला.

सैफ अली खान आणि क्रिकेटचे फार जवळचे नाते आहे. त्याचे आजोबा इफ्तिकार अली खान पतौडी आणि वडील मन्सूर अली खान पतौडी (टायगर पतौडी) भारतीय क्रिकेट इतिहासातील दिग्गज नावे आहेत. दोघांनी भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिलेले आहे. सैफ अली खानने क्रिकेटमध्ये न जाता अभिनय क्षेत्राची निवड केली. असे असले तरी तो क्रिकेटचा चाहता आहे. क्रिकेटमधील अनेक खेळाडूंसोबत त्याची चांगली मैत्री आहे. याची झलक ओव्हलच्या मैदानावर दिसली.

सैफ अली खानने ओव्हल येथे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज सलामीवीर गॉर्डन ग्रीनिज यांची भेट घेतली. यावेळी त्याची पत्नी करिना कपूर खान आणि मुलगा तैमुरदेखील होते. सर्वांनी मिळून भारत आणि इंग्लंडदरम्यानचा पहिला एकदिवसीय सामना बघितला. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. करिना कपूरने स्वत: आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

Story img Loader