फ्रान्स सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत गुरुवारचा दिवस भारतासाठी अपयशी ठरला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल, जागतिक कांस्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू या दोघींनाही दुसऱ्याच फेरीत अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. या दोघींसह अजय जयराम, युवा कदम्बी श्रीकांत आणि मुंबईकर आनंद पवार हेही पराभूत झाल्याने स्पर्धेतील भारताच्या सर्वच खेळाडूंनी स्पध्रेतील गाशा गुंडाळला आहे.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या आणि स्पर्धेसाठी चौथे मानांकन लाभलेल्या सायनावर कोरियाच्या यिआन ज्यु बेइने २०-२२, २१-१५, २२-२० असा विजय मिळवला. वर्षांतील पहिल्यावहिल्या जेतेपदाची सायनाची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडली आहे. अतिशय चुरशीच्या मुकाबल्यात सायनाने पहिला गेम जिंकला. मात्र सायनाच्या हालचालीतील शैथिल्याचा फायदा उठवत बेइने सरशी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी संघर्ष झाला. मात्र २०-२० अशा बरोबरीत दोन गुण पटकावत बेइने बाजी मारली.
डेन्मार्क सुपर सीरिज स्पर्धेत सलामीच्या फेरीत पराभूत झालेल्या सिंधूला फ्रान्स सुपर सीरिज स्पर्धेत दुसऱ्या फेरीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. स्कॉटलंडच्या कस्र्टी गिलमूरने सिंधूवर १०-२१, २१-१९, २१-१६ अशी मात केली. पहिला गेम सहजपणे जिंकत सिंधूने आश्वासक सुरुवात केली होती, मात्र दुसऱ्या गेममध्ये तिच्या हातून खूप चुका झाल्या. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सिंधूने जोरदार संघर्ष केला, परंतु गिलमूरने मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत तिसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला. पुरुषांमध्ये युवा खेळाडू कदम्बी श्रीकांतलाही पराभवाला सामोरे जावे लागले. थायलंडच्या बूनसुक पोनसन्नाने श्रीकांतवर १५-२१, २१-१८, २१-१५ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ली चोंग वेईने अजय जयरामवर २१-१८, २१-१८ अशी मात केली. तानगोग्सकने सेइनसोमबुनसुकने आनंद पवारवर २२-२०, २१-१८ असा विजय मिळवला.

Story img Loader