भारताचा ऑलिम्पिकपटू पारुपल्ली कश्यपला इंडियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तौफिक हिदायत या इंडोनेशियाच्या खेळाडूने त्याच्यावर १३-२१, २३-२१, २१-१८ अशी मात केली. भारताच्या सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, सौरभ वर्मा व आनंद पवार यांनी एकेरीत विजयी सलामी केली.
अग्रमानांकित व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने इंडोनेशियाच्या वेलाड्रिक्स मानुपुती हिच्यावर २१-१२, २१-१५ अशी सरळ दोन गेम्समध्ये मात केली. पुण्याच्या सायली गोखले हिला आव्हान टिकविण्यात अपयश आले. तिसऱ्या मानांकित राचनोक इन्तानोवा हिने तिला २१-८, २१-१२ असे सहज पराभूत केले.
मिश्र दुहेरीत जागतिक कांस्यपदक विजेत्या दिजू व ज्वाला यांनी ख्रिस लँग्रिज व हीदर ऑलिव्हर या ब्रिटिश जोडीचा १९-२१, २१-१५, २१-१६ असा पराभव केला. भारताच्याच प्रज्ञा गद्रे व अक्षय देवळकर यांनीही विजयी वाटचाल केली. त्यांनी अँड्रय़ू एलिस व कॅरेन स्मिथ यांचा २१-७, १८-२१, २१-१२ असा पराभव केला. अपर्णा बालन व अरुण विष्णू यांना पराभवास सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या ख्रिस अ‍ॅडकॉक व गॅब्रियल व्हाईट यांनी त्यांच्यावर २१-१५, २१-१६ अशी मात केली.

Story img Loader