दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या सायना नेहवालला स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतही जेतेपदाने हुलकावणी दिली. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतच चीनच्या शिझियान वांग हिने अव्वल मानांकित सायनाचे आव्हान संपुष्टात आणले. शिझियान ही सायनापेक्षा खालच्या क्रमांकावर असल्याने सायनाला जेतेपदाची संधी होती. पण ५० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायनाला ११-२१, २१-१०, ९-२१ असा पराभव पत्करावा लागला. आपल्या वाढदिवसा दिवशीच सायनाला सुरेख कामगिरी करता आली नाही. सायनाची सुरुवात निराशाजनक झाली. त्यामुळे जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या शिझियानने सुरुवातीलाच ८-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर सायनाला शिझियानला गाठता आले नाही. दुसऱ्या गेममध्ये दोघींनीही तोडीस तोड खेळ केला. पण १३-१० अशा स्थितीतून सलग आठ गुण मिळवून दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये चुकीच्या फटक्यांचा आणि निर्णयांचा फटका सायनाला बसला. शिझियानने सायनाला सामन्यात परतण्याची कोणतीच संधी दिली नाही. आता शिझियान आणि थायलंडच्या रात्चानोक इन्थानोन यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे.

Story img Loader