सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू आणि पी. कश्यप या त्रिकुटाने कोरिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि तृतीय मानांकित सायनाने थायलंडच्या सॅपसिरी तेअरॅट्टानचायविरुद्ध थोडी चाचपडत सुरुवात केली आणि पहिला गेम गमावला. सॅपसिरीने स्मॅशचे जोरदार फटक्यांसह नेटजवळ शिताफीने खेळ करत पहिल्या गेमवर कब्जा केला.
दुसऱ्या गेममध्ये मात्र सायनाने सॅपसिरीला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. सलग सहा गुणांची कमाई करत सायनाने मोठी आघाडी घेतली. या आघाडीच्या बळावरच दुसरा गेम नावावर केला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. सायनाने सुरुवातीला ३-० अशी आघाडी मिळवली. यानंतरही ती १६-१३ अशी पुढे होती. मात्र सॅपसिरीने सहा गुण मिळवत मुकाबला १९-२० असा केला. मात्र यानंतर सायनाने झटपट गुण मिळवत तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.
सायनाने हा सामना १७-२१, २१-९, २१-१९ असा जिंकला. दुसऱ्या फेरीत सायनाचा मुकाबला सिंगापूरच्या मिंगटिअन फूशी होणार आहे. फूविरुद्धच्या याआधी झालेल्या तीन लढतींत सायनाने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे.
युवा खेळाडू पी. व्ही. सिंधूने लिंडावेनी फॅन्ट्रीला नमवत महिनाभरापूर्वी झालेल्या सय्यद मोदी ग्रां. प्रि. स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवाचा वचपा काढला. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानी असणाऱ्या सिंधूने फॅन्ट्रीवर २२-२०, २१-१६ असा विजय मिळवला. दुसऱ्या फेरीत सिंधूचा सामना थायलंडच्या पॉर्नटिप बुरानप्रासेरटय़ुकशी होणार आहे. लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ली झेरूईने सामन्यातून माघार घेतल्याने पॉर्नटिपला विजयी घोषित करण्यात आले. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपने ४० मिनिटांत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेता राजीव ओयुसफचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत कश्यपची लढत हाँगकाँगच्या सातव्या मानांकित युन ह्य़ूशी होणार आहे. या दोघांमध्ये २०१० बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत झालेल्या एकमेव लढतीत ह्य़ुने कश्यपवर मात केली होती. या पराभवाचा बदला घेण्याची संधी कश्यपला मिळणार आहे.

Story img Loader