भारताची ‘फुलराणी’ कोर्टवर खेळू लागली की आपल्या भात्यातील अफलातून फटक्यांनी सर्वाना मोहून टाकते. दमदार स्मॅशेस, नेटवरील अप्रतिम खेळ, बॉडीलाइन स्मॅशेस आणि क्रॉसकोर्ट्सच्या फटक्यांनी ती प्रतिस्पध्र्याला नामोहरम करते. दुसऱ्या महामुकाबल्यात सायना नेहवालने अवध वॉरियर्सचे ‘सिंधूअस्त्र’ सहजपणे फोल ठरवत इंडियन बॅडमिंटन लीगमधील विजयाचा झरा अखंडपणे वाहत ठेवला. सायना, गोह शेम-वाह लिम खिम आणि अजय जयराम यांच्या विजयी कामगिरीमुळे हैदराबाद हॉटशॉट्सने अंतिम लढतीत अवध वॉरियर्सचा ३-१ असा धुव्वा उडवत पहिल्यावहिल्या आयबीएल जेतेपदावर मोहोर उमटवली.
वरळीच्या एनएससीआय स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम लढतीत सर्वाच्या नजरा खिळल्या होत्या त्या सायना आणि पी. व्ही. सिंधू लढतीकडे. देशातील दोन अव्वल महिला खेळाडूंमध्ये रंगलेल्या लढतीत सायनाने सिंधूला डोके वर काढण्याची संधीही न देता बाजी मारली. एकतर्फी झालेला हा सामना सायनाने २१-१५, २१-७ असा जिंकत आयबीएलमधील सातवा विजय नोंदवला. त्याआधी किदम्बी श्रीकांत आणि एस. टॅनोंगसॅक यांच्यात रंगलेल्या पहिल्या लढतीत जागतिक क्रमवारीतील ३८व्या स्थानावरील श्रीकांतने १९व्या क्रमांकावरील टॅनोंगसॅकचे आव्हान २१-१२, २१-२० असे लिलया पेलत हैदराबादला पहिला हादरा दिला होता.
सायनाने सुरुवातीपासूनच ताकदवान स्मॅशेसची सरबत्ती करत पहिल्या गेममध्ये ८-३ अशी भक्कम आघाडी घेतली. सायनाच्या स्मॅशेसवर सिंधू निरुत्तर झाल्यामुळे तिचे फटके नेटवर जाऊन आदळत होते. मात्र एका क्षणी खेळ उंचावत सिंधूने १२-१४ अशी पिछाडी भरून काढली. सायनाने बॉडीलाइन स्मॅशेसवर भर दिल्याने सिंधूला तिचे फटके परतवून लावता आले नाहीत. सायनाने सलग पाच गुण मिळवत १९-१२ अशी आगेकूच केली. सिंधूने दोन गेमपॉइंट वाचवले. पण एका अफलातून स्मॅशद्वारे चोख प्रत्युत्तर देत पहिल्या गेम आपल्या नावावर केला. प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळत असताना सायनाचा खेळही बहरत होता. त्याउलट मनोधैर्य खचलेल्या सिंधूचे बरेचसे फटके कोर्टबाहेर जात होते किंवा नेटवर आदळत होते. त्यामुळे ८-१ अशा सुरुवातीनंतर ती १६-७ अशी पुढे निघून गेली होती. त्यानंतर सलग पाच गुण मिळवत सायनाने हैदराबादला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
आतापर्यंत एकतर्फी रंगलेल्या मुकाबल्यानंतर पुरुष दुहेरीच्या तिसऱ्या सामन्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. गोह शेम-वाह लिम खिम या हैदराबादच्या जोडीने रोमहर्षक रंगलेल्या सामन्यात अवधच्या मार्किस किडो-मथियास बोए या फॉर्मात असलेल्या जोडीवर २१-१४, १३-२१, ११-४ अशी मात करत हैदराबादला जेतेपदाच्या समीप आणून ठेवले.
चौथ्या सामन्यात आरएमव्ही गुरुसाईदत्त जिंकण्याच्या स्थितीत असताना मुंबईकर अजय जयरामने घरच्या प्रेक्षकांच्या साक्षीने अवध वॉरियर्सच्या घशातून विजयाचा घास हिरावून घेत हैदराबादला हा सामनाजिंकून देत आयबीएलचे जेतेपद मिळवून दिले. अजयने हा सामना १०-२१, २१-१७, ११-७ असा खिशात घातला.
एनएससीआय कोर्टवरून..
सायना नेहवाल दुहेरीतही
आंतरराष्ट्रीय स्तरावर सायना नेहवालने एकेरी प्रकारात खेळतानाच दिमाखदार यश मिळवले आहे. मात्र इंडियन बॅडमिंटन लीगच्या सांघिक स्वरुपाची गरज लक्षात घेत सायनाला दुहेरीतही खेळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हैदराबाद हॉटशॉट्च्या संघ व्यवस्थापनाने घेतला. तरुण कोना आणि प्रज्ञा गद्रे या जोडीला अपेक्षित यश न मिळाल्याने हैदराबादने गोह व्ही. खिमच्या साथीने सायनाला दुहेरीत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. कारकीर्दीत सुरुवातीला सायना दुहेरी खेळत असे.
यजमान संघ नसल्याचा फटका
शहरांवर आधारित असलेल्या या आयबीएल स्पर्धेत आपापल्या शहरातील संघाला प्रेक्षक पाठिंबा देतात. या स्पध्रेत मुंबई शहरातर्फे मुंबई मास्टर्स हा संघ होता. मात्र मुंबई मास्टर्स संघाचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. अंतिम लढत मुंबईत मात्र या लढतीत मुंबईचा संघ नसल्याने एखाद्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला जशी वातावरण निर्मिती होते तशी झालीच नाही. केवळ सायना-सिंधू लढत पाहायला मिळणार या उद्देशाने प्रेक्षक उपस्थित होते.
गोपीचंद सरांची शिस्त
दोन सामन्यांदरम्यान प्रायोजकांच्या छोटेखानी स्पर्धेसाठी भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक आणि आयबीएल प्रशासकीय परिषदेचे सदस्य गोपीचंद यांना कोर्टवर बोलावण्यात आले. गोपीचंद आपल्या कडक शिस्तीसाठी ओळखले जातात. या सद्गुणाचा प्रत्यय त्यांनी इथेही घडवला. कोर्टवर जाण्यासाठी स्पोर्ट्स शूज आवश्यक असतात. गोपीचंद यांनी स्पोर्ट्स शूज परिधान केले नव्हते. नियमाचा भंग करण्याऐवजी गोपीचंद यांनी आपली पादत्राणे काढून ठेवली आणि मोज्यांवर कोर्टवर प्रवेश केला.
मुख्यमंत्री वेळेत.. प्रेक्षक उशिरा
राजकीय नेते कार्यक्रमाला उशिरा येण्यासाठी प्रसिद्ध असतात. मात्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याला अपवाद ठरले. सामना सुरू होण्यापूर्वीच ते प्रेक्षागृहात दाखल झाले. हैदराबाद आणि अवध दोन्ही संघांच्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र हे सगळे सुरू असताना थोडेच प्रेक्षक उपस्थित होते. पहिल्या सामन्याची वेळ रात्री ८ची असूनही बहुतांशी प्रेक्षक उशिरा आले.
– पराग मुंबईकर
अंतिम फेरीचा निकाल
हैदराबाद हॉटशॉट्स अवध वॉरियर्स निकाल
एस. टॅनोंगसॅक किदम्बी श्रीकांत १२-२१, २०-२१
सायना नेहवाल पी. व्ही. सिंधू २१-१५, २१-७
गोह शेम-वाह लिम खिम मार्किस किडो-मथियास बोए २१-१४, १३-२१, ११-४
अजय जयराम आरएमव्ही गुरुसाईदत्त १०-२१, २१-१७, ११-७