सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या सायनाने फ्रान्सच्या सशिना विग्नेस वारनला १३-२१, २१-१५, २१-१२ असे नमवले. सायनाची पुढची लढत पेटया नेडेलचेव्हाशी होणार आहे. कश्यपने जर्मनीच्या डिइटर डोमकेचा १५-२१, २२-२०, २१-१३ असा पराभव केला.
२०११मध्ये याच स्पर्धेत सायनाने सशिनावर मात केली होती, मात्र बुधवारी पहिल्या गेममध्ये सशिनाने वर्चस्व राखले. दुसऱ्या गेममध्ये सायना २-५ अशी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर सायनाने स्मॅश तसेच नेटजवळून सुरेख खेळ करत १३-१३ अशी बरोबरी केली. यानंतर सलग पाच गुणांची कमाई करत सायनाने आघाडी मिळवली. या आघाडीच्या आधारे आगेकूच करत सायनाने दुसरा गेम जिंकला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाने कोर्टवरच्या सहज वावरासह वैविध्यपूर्ण फटके पोतडीतून बाहेर काढले. सुरुवातीला ३-० अशी आघाडी घेणाऱ्या सायनाने सातत्याने आघाडी वाढवली आणि तिसऱ्या गेमसह सामना जिंकला.
पुरुषांमध्ये कश्यप आणि जर्मनीच्या डोमके यांच्यात चुरशीचा मुकाबला रंगला. पहिल्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी दोघांनी जीवाचे रान केले. मुकाबला १२-१२ अशा परिस्थितीत असताना डोमकेने सहा गुणांची कमाई केली. या आघाडीचा फायदा उठवत डोमकेने पहिल्या गेमवर कब्जा केला.
दुसऱ्या गेममध्येही एकेक गुणासाठी दोघांनी प्रयत्नांची शिकस्त केली. या गेममध्येही १२-१२ अशी बरोबरी झाली. मात्र यानंतर कश्यपने आपला खेळ उंचावत १५-१२ अशी आघाडी घेतली. सामन्यातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी गेम जिंकणे अनिवार्य असलेल्या कश्यपने स्मॅश, ड्रॉप, क्रॉसकोर्ट या फटक्यांचा प्रभावीपणे वापर करत दुसरा गेम जिंकला.
तिसऱ्या आणि अंतिम गेममध्ये कश्यपने पाच गुणांची आघाडी घेतली. ही आघाडी बळकट करत कश्यपने तिसऱ्या गेमसह सामना जिंकला. पुढच्या फेरीत कश्यपचा मुकाबला मलेशियाच्या वेई फेंग चोंगशी होणार आहे. पी.व्ही. सिंधूने दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. सिंधू ७-२ अशी आघाडीवर असताना प्रतिस्पर्धी खेळाडू जि ह्य़ुन स्युंगने माघार घेतल्यामुळे सिंधूला विजयी घोषित करण्यात आले.
पुरुष दुहेरीमध्ये प्रणव चोप्रा आणि अक्षय देवलकर यांनी थायलंडच्या बोडिन इसारा आणि सुडकेत प्रापकमोल जोडीवर १२-२१, २१-१७, २१-१५ असा विजय मिळवला.
सायना पुन्हा दुसऱ्या स्थानी
नवी दिल्ली : ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाचे सायनाचे स्वप्न अधुरे राहिले, मात्र या स्पर्धेतील प्रदर्शनाचा सायनाच्या क्रमवारीतील स्थानावर सकारात्मक परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रमवारीत तिसऱ्या स्थानी घसरण झालेल्या सायनाने पुन्हा एकदा दुसरे स्थान पटकावले आहे. पुरुषांमध्ये पारुपल्ली कश्यपने सातव्या स्थानी झेप घेत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.  ऑल इंग्लंड स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात थायलंडच्या रत्वानोक इनथॅनॉनविरुद्ध सायनाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र या मानाच्या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंतच्या वाटचालीचा सायनाला फायदा झाला. कश्यप याच स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभूत झाला. या स्पर्धेतील तिसऱ्या टप्प्यापर्यंतच्या वाटचालीमुळे त्याने नवव्या स्थानावरून सातव्या स्थानी आगेकूच केली आहे. अजय जयराम ३१व्या स्थानी स्थिर आहे तर आरएमव्ही गुरुसाईदत्त ३६ तर सौरभ वर्मा ३९व्या स्थानी आहे. आनंद पवार ४४व्या स्थानी आहे. महिलांमध्ये पी.व्ही.सिंधूने १६वे स्थान कायम राखले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा