भारताची स्टार खेळाडू सायना नेहवालपुढे सय्यद मोदी चषक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद राखण्याचे लक्ष्य आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीला मंगळवारी सुरुवात होणार आहे.
२४ वर्षीय सायनाने २००९ व २०१० मध्ये या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. तिला गतवर्षीची उपविजेती खेळाडू पी. व्ही. सिंधू, विद्यमान विश्वविजेती खेळाडू कॅरोलीना मरीन यांच्याकडून चिवट लढत मिळण्याची शक्यता आहे. सायनाला येथे पहिल्या फेरीत मलेशियाच्या यिन फुनलिम हिच्याशी खेळावे लागणार आहे.
गतवर्षी अनेक स्पर्धामध्ये कांस्यपदक मिळविणाऱ्या सिंधूला पहिल्या फेरीत तुलनेने सोपा पेपर आहे. तिला पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूशी लढावे लागणार आहे. सिंधूने नुकत्याच झालेल्या मलेशियन ग्रां.प्रि. स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती.
चीन सुपर स्पर्धेत दोन वेळा ऑलिम्पिक विजेता लिन दानवर मात करत विजेतेपद मिळविणारा कदाम्बी श्रीकांत याच्या विजेतेपदाच्या मार्गात त्याचा सहकारी अजय जयराम तसेच इंडोनेशियन मास्टर्स विजेता एच.एस.प्रणोयच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. अर्थात पहिल्या फेरीत त्याला भारताच्याच श्रेयांश जयस्वालशी खेळावे लागेल. राष्ट्रकुल विजेता पारुपल्ली कश्यप याच्याकडूनही येथे अव्वल कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला पहिल्या फेरीत पुण्याचा खेळाडू शुभंकर डे याच्याबरोबर खेळावे लागणार आहे. व्हिक्टर अॅलेक्सन (डेन्मार्क) व वेई फेंग चोंग (मलेशिया) हे परदेशी खेळाडूही विजेतेपदाचे दावेदार मानले जात आहेत.
राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. पुरुषांच्या दुहेरीत मनु अत्री व बी. सुमेध रेड्डी यांना पहिल्या फेरीत मलेशियाच्या व्ही. शोम गोह व वेई किओंग तान यांच्याशी झुंज द्यावी लागणार आहे. सहाव्या मानांकित प्रणव चोप्रा व अक्षय देवळकर यांची नेपाळच्या बिकाश श्रेष्ठा व रत्नजित तमांग यांच्याशी गाठ पडणार आहे.
गतवर्षी माझी कामगिरी चांगली झाली असून यंदा ही स्पर्धा जिंकून विजयी वर्षांरंभ करण्याचा माझा मानस आहे. अर्थात त्यासाठी मला सिंधू व कॅरोलीना यांच्याविरुद्ध विजय मिळविण्यासाठी खूप परिश्रम करावे लागणार आहेत. त्याची मी पूर्वतयारी केली आहे.
– सायना नेहवाल, भारताची महिला बॅडमिंटनपटू