क्वालालम्पूर : ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि किदम्बी श्रीकांत या भारतीय बॅडमिंटनपटूंनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत शानदार सुरुवात करत दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे.

सातव्या मानांकित सायनाला पहिल्याच फेरीत विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला तरी तिने हाँगकाँगच्या जोय झुआन डेंग हिचे आव्हान १४-२१, २१-१८, २१-१८ असे परतवून लावले. एक तास पाच मिनिटे रंगलेल्या या सामन्यात विजय मिळवल्यानंतर सायनाची पुढील फेरीत गाठ हाँगकाँगच्या पुई यिन यिप हिच्याशी पडेल. कश्यप यालाही डेन्मार्कच्या रासमस गेमके याने विजयासाठी चांगलेच झुंजवले. अखेर पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत कश्यपने १९-२१, २१-१९, २१-१० असा विजय साकारत आगेकूच केली. कश्यपला दुसऱ्या फेरीत इंडोनेशियाच्या सहाव्या मानांकित अँथनी सिनिसुका याच्याशी झुंज द्यावी लागेल.

सातव्या मानांकित श्रीकांतला विजय मिळवण्यासाठी मात्र घाम गाळावा लागला नाही. श्रीकांतने ३० मिनिटे रंगलेल्या सामन्यात हाँगकाँगच्या अँगस का लाँग एनजी याला २१-१७, २१-११ असे पराभूत केले. श्रीकांतचा दुसऱ्या फेरीतील सामना हाँगकाँगच्या विन्सेंट विंग की वाँग याच्याशी होईल.

महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांनी हाँगकाँगच्या याऊ एनजी आणि सिन यिंग युएन या जोडीवर २१-१६, २२-२० अशी मात करत पहिल्या फेरीचा अडसर दूर केला. त्यांना आता इंडोनेशियाच्या नि केतूट महादेवी इस्ताराणी आणि रिझकी अमेलिया प्रदिप्ता यांच्याशी लढत द्यावी लागेल. मिश्र दुहेरीत, प्रणव जेरी चोप्रा आणि सिक्की रेड्डी यांचे आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले. त्यांना नेदरलँड्सच्या रॉबिन टॅबेलिंग आणि सेलेना पिएक यांच्याकडून १९-२१, १७-२१ असे पराभूत व्हावे लागले.

Story img Loader