Saina Nehwal Angry on Fans: सायना नेहवाल भारतासाठी बॅडमिंटनमध्ये पहिलं ऑलिम्पिक जिंकणारी खेळाडू आहे. सायनाने २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले होते. सायनाने भारतातील बॅडमिंटन खेळाडूंना ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी प्रभावित केले होते. पण सायना सध्या यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होती.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये घडलेल्या सर्व गोष्टींबद्दल सायनाने आपले मत मांडले होते, ज्यामुळे ती मोठा चर्चेचा विषय ठरली. कुस्तीपटू विनेश फोगट आणि तिच्या सपोर्ट स्टाफने तिचे वजन कमी करू न शकल्यामुळे आणि तिच्या सुवर्णपदकाच्या सामन्यातून आश्चर्यकारकपणे अपात्र ठरल्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे असे ती म्हणाली. या वक्तव्यानंतर सायनावर मोठी टीका झाली. सायना आणि तिचा पती, माजी खेळाडू पारुपल्ली कश्यप यांनी अलीकडेच या टीकेला उत्तर दिले आहे.
“पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान सायनाने काहीतरी वक्तव्य केले होते आणि त्या वक्तव्याच्या सोशल मीडिया पोस्टच्या कमेंट्समध्ये मी लोकांना असे म्हणताना पाहिले की तिला कांस्यपदक भेट म्हणून मिळाले आहे,” कश्यपने आरजे अनमोल आणि अभिनेत्री अमृता राव यांच्याशी संवाद साधताना सांगितले. यावर सायनाने बेधडक उत्तर दिले आणि म्हणाली, “ऑलिम्पिक खेळण्याच्या पात्रतेचे तरी व्हा, आधी ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय होऊन दाखवा.”
२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमधील दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेत्या वांग झिनला दुसऱ्या गेमदरम्यान दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले आणि सायनाला कांस्यपदक विजेता घोषित केले होते. सायनाने पहिला गेम २१-१८ असा गमावला होता. तो सामना आठवताना सायना म्हणाली, “ती अशा प्रकारची खेळाडू नव्हती जी कोर्टवर तिच्या वेदना किंवा भावना दाखवेल. पण मला दिसलं की तिला त्रास होत आहे आणि मला तिच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं आणि मला वाटलं की इथे काहीतरी घडतंय.”
हेही वाचा – Ganesh Chaturthi: बांगलादेशच्या खेळाडूने गणेश चतुर्थीनिमित्त केली बाप्पाची प्रतिष्ठापना, फोटो केले शेअर
“मला तिच्याइथून काहीतरी आवाज आला आणि ती अचानक खाली बसली. पण तेव्हा मला वाटलं नाही की तिला काहीतरी झालंय. यानंतर पुढचे दोन-तीन गुण मिळवताना तिला त्रास होत होता आणि मग अचानक तिने हात पुढे केला. मला कळलंच नाही नेमकं काय सुरू आहे. तितक्यात ती म्हणाली, खूप वाईट, खूप वाईट…. गोपी सर त्यावेळेला खूप आनंदी दिसत होते आणि सांगितले की मी पदक पटकावलं आहे. मला तेव्हा काहीच कळतं नव्हतं… असं सायना म्हणाली.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदके जिंकली. पण या ऑलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनमधून सर्वाधिक पदकांची अपेक्षा होती, पण भारताला बॅडमिंटनमध्ये एकही पदक मिळवता आले नाही. दोन वेळा पदकविजेती पीव्ही सिंधू, वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेता एचएस प्रणॉय, स्टार पुरुष दुहेरी जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि लक्ष्य सेन यांच्यात भारताचे प्रबळ दावेदार होते. चांगली कामगिरी करणाऱ्या लक्ष्यने कांस्यपदकाची लढत गमावली.