Saina Nehwal Challenge to Jasprit Bumrah : भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अलीकडेच भारताच्या क्रीडा संस्कृतीत क्रिकेटच्या वर्चस्वाबद्दल सुरू असलेल्या वादावर उघडपणे बोलली होती. सायना म्हणाली होती की, क्रिकेटपेक्षा इतर खेळांना जास्त शारीरिक ताकद लागते. यानंतर सोशल मीडियावर क्रिकेट विरुद्ध इतर खेळ असा वाद सुरू झाला. केकेआरचा खेळाडू अंगक्रिश रघुवंशी याने सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहच्या १५०+ किमी प्रतितास वेगवान चेंडूचा सामना करण्याचे आव्हान सायना नेहवालला दिल्याने हा वाद आणखी वाढला. या कमेंटमुळे अनेकजण दुखावले गेले आणि त्यानंतर अंगकृष्ण रघुवंशीला सायनाची माफी मागावी लागली होती. आता सायना नेहवालचा नवा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अंगक्रिशने सायनाची मागितली होती माफी –
क्रिकेटपेक्षा बॅडमिंटन, टेनिस आणि बास्केटबॉलसारखे खेळ शारीरिकदृष्ट्या अधिक आव्हानात्मक आहेत, असे नेहवालने महिन्याभरापूर्वी आपल्या म्हटले होते. यावर क्रिकेट चाहते संतप्त झाले होते. त्यात कोलकाता नाईट रायडर्सचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याने सोशल मीडियावर एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली, ज्याने नेहवालला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेंडूला सामोरे जाण्याचे आव्हान दिले होते. अंगक्रिशने एक्स वर लिहिले होते की, “बुमराहने १५० किमी प्रतितास वेगाने चेंडू तिच्या डोक्यावर टाकेल, तेव्हा ती कशी कामगिरी करेल ते पाहूया.” या कमेंटनंतर अंगक्रिशने माफी मागितली आणि माझी पोस्ट केवळ विनोद असल्याचे म्हटले.
भारताच्या क्रीडा संस्कृतीवर क्रिकेटचे फार पूर्वीपासून वर्चस्व आहे, जे सहसा इतर खेळांकडे दुर्लक्ष करते. २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारी नेहवाल ही देशातील क्रिकेटशिवाय इतर खेळांची समर्थक आहे. यामुळेच तिने पुन्हा एकदा क्रिकेटबाबत वक्तव्य केले आहे. सायनाने अंगक्रिशच्या पोस्टबाबत एक विधान केले आहे, ज्यामध्ये तिला बुमराहचा सामना करण्याचे आव्हान देण्यात आले होते.
बुमराह माझ्या स्मॅशचा सामना करू शकणार नाही –
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टवर सायना म्हणाली, “मी जसप्रीत बुमराहला का सामोरे जायचे? जर मी ८ वर्षापासून खेळत असते, तर कदाचित मी जसप्रीत बुमराहचा सामना केला असता. तसेच जर जसप्रीत बुमराह माझ्यासोबत बॅडमिंटन खेळला तर कदाचित तो माझ्या स्मॅशचा सामना करू शकणार नाही. आपल्याच देशात या गोष्टींवरून आपण आपापसात भांडू नये. हेच मला आधी सांगायचे होते. प्रत्येक खेळ त्याच्या स्वत: च्या ठिकाणी सर्वोत्तम आहे. पण मला सांगायचे आहे की इतर खेळांनाही महत्त्व द्या. नाहीतर क्रीडा संस्कृती कुठून आणणार? कारण आपला फोकस हा नेहमीच क्रिकेट आणि बॉलीवूड राहिला आहे.”