नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन पदक विजेती बॅडिमटनपटू सायना नेहवालने आशियाई मिश्र सांघिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी होणाऱ्या राष्ट्रीय निवड चाचणीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई स्पर्धा १४ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत दुबईत पार पडणार आहे.
या स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी सायनासह आकर्षी काश्यप आणि मालविका बनसोड यांची निवड करण्यात आली होती. आशियाई स्पर्धेत पी. व्ही. सिंधूची आधीच निवड झाली असून दुसऱ्या महिला खेळाडूच्या स्थानासाठी या तिघींची निवड चाचणी रंगणार होती. मात्र, या तिघींपैकी सायना आणि मालविका यांनी निवड चाचणीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला.
सायना आणि मालविकाने आपली अनुपलब्धता संघटनेला कळविली असून, आता त्यांच्या जागी अस्मिता चलिहाला निवड चाचणीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे आता एका जागेसाठी आकर्षी आणि अस्मितामध्ये चुरस असेल.
सिंधू, लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांच्यासह पुरुष दुहेरी जोडी सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांना जागतिक मानांकनामुळे भारतीय संघात थेट प्रवेश देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. पुरुष विभागात एमआर अर्जुनदेखील दुखापतीमुळे चाचणीतून माघार घेतली आहे. पुरुष दुहेरीसाठी एका जोडीची जागा रिक्त असून यासाठी कृष्णा प्रसाद गर्ग-विष्णूवर्धन गौड, इशान भटनागर-साई पथिक यांच्यात चुरस असेल.
महिला दुहेरीसाठी दोन जागा असून, यामध्ये जागतिक क्रमवारीत १७ व्या स्थानावर असणाऱ्या ट्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद यांना प्रथम प्राधान्य असेल. अश्विनी भट-शिखा गौतम, हरिथा मनाझियिल-अश्ना रॉय या जोडय़ादेखील चाचणीसाठी उपलब्ध असतील. मिश्र दुहेरीसाठी इशान भटनागर-तनिशा क्रॅस्टो, रोहन कपूर-एन. सिक्की रेड्डी यांच्यातून एका जोडीची निवड होईल.