भारताची ‘फुलराणी’ अर्थात सायना नेहवाल हिने इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली आहे. गतविजेत्या सायनाने स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिचा सहज पराभव करून इंडोनेशिया स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे. भारताचे बॅडमिंटनपटू अजय जयराम आणि आरएमव्ही. गुरुसाईदत्त यांना उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचे धक्केसहन करावे लागल्यामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सायनाने कॅरोलिना हिचा ३९ मिनिटांत २१-१६, २१-१९ असा धुव्वा उडवला. सायनाने या स्पर्धेत २००९पासून चार वेळा अंतिम फेरीत मजल मारली असून तीन वेळा (२००९, २०१०, २०१२) जेतेपद पटकावले आहे. सायनाने पहिल्या गेममध्ये रॅलीवर अधिक भर दिला. कोर्टवर स्थिरावल्यानंतर सायनाने आपल्या पोतडीतील एकापेक्षा सरस फटके बाहेर काढत आघाडीच्या दिशेने कूच केली. १२-१२ अशा स्थितीतून सायनाने नऊ गुण मिळवत पहिला गेम आरामात जिंकला. त्या तुलनेत कॅरोलिना हिला चार गुणांची कमाई करता आली. दुसऱ्या गेममध्ये कॅरोलिना हिने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली, पण सायनाने १०-१० अशी बरोबरी साधल्यानंतर कॅरोलिना १६-१५ अशा स्थितीत होती. तिने तीन गुण मिळवत दुसरा गेम जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली. अखेर सायनाने आपला अनुभव पणाला लावत सलग सहा गुण मिळवले आणि दुसऱ्या गेमसह सामना जिंकला. उपांत्य फेरीत सायनाचा सामना जर्मनीच्या ज्युलियन श्चेंक हिच्याशी होणार आहे.
पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत जयरामला मार्क वेबलरकडून १६-२१, १५-२१ अशी हार पत्करावी लागली. गुरुसाईदत्तने कडवी झुंज दिली, पण इंडोनेशियाच्या टॉमी सुगीआटरेने त्याचे आव्हान २१-१९, ११-२१, १०-२१ असे संपुष्टात आणले.
इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धा : सायना उपांत्य फेरीत
भारताची ‘फुलराणी’ अर्थात सायना नेहवाल हिने इंडोनेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली आहे. गतविजेत्या सायनाने स्पेनच्या कॅरोलिना मारिन हिचा सहज पराभव करून इंडोनेशिया स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे.
First published on: 15-06-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal enters indonesia open semi final