ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने संघर्षपूर्ण लढतीनंतर विजय मिळविण्याची किमया साधताना सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. भारताच्या अन्य स्पर्धकांचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे. सायनाने जपानच्या एरिको हिरोसी हिच्यावर १६-२१, २१-१६, २१-९ अशी मात केली. भारताच्या बी. साईप्रणीत याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित झाली. मलेशियाच्या वेई फेंग चोंग याने त्याचा २१-११, १७-२१, २१-१६ असा पराभव केला. पुरुषांच्या दुहेरीत दक्षिण कोरियाच्या बेक चोएल शिन व यिआन सिओन योंग यांनी प्रणव चोप्रा व अक्षय देवळलकर यांच्यावर २१-१४, २१-९ अशी सरळ दोन गेम्समध्ये मात केली. मिश्र दुहेरीत अरुण विष्णू व अपर्णा बालन यांनाही पराभवास सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या प्रवीण जॉर्डन व व्हिटा मॅरिसा यांनी त्यांना २१-१०, २१-१८ असे पराभूत केले.
सायना हिला हिरोसीविरुद्ध विजय मिळविण्यासाठी झगडावे लागले. पहिल्या गेममध्ये १४-१४ अशा बरोबरीनंतर हिरोसीने दोन गुणांची आघाडी घेतली. ही आघाडी कायम ठेवीत तिने हा गेम जिंकला. त्यानंतर आक्रमक खेळ करत सायनाने पुढील दोन्ही गेम जिंकून उपांत्यपूर्व फेरीत थाटात स्थान मिळविले.

Story img Loader