भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात नवी क्रांती घडवू पाहणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या संकल्पनेचा पहिला टप्पा सोमवारी पार पडला. सहा संघांमध्ये रंगलेल्या बॅडमिंटनपटूंच्या लिलावात भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे घरच्या संघाकडून खेळण्याचे स्वप्न अखेर साकार होणार आहे. हैदराबाद हॉटशॉट्स संघाने सायनावर एक लाख २० हजार अमेरिकन डॉलरची बोली लावून तिला करारबद्ध केले. मात्र जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला मलेशियाचा चोंग वुई लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई मास्टर्स संघाने एक लाख ३५ हजार अमेरिकन डॉलरला विकत घेतले.
सहा ‘आयकॉन’ खेळाडूंपैकी एक असलेल्या सायनाने हैदराबाद किंवा लखनौ या संघांकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. हैदराबादने तिच्यावर जवळपास ७१ लाख २७ हजार ७९६ रुपयांची बोली लावली. चोंग वुईला करारबद्ध करण्यासाठी मुंबई मास्टर्स आणि दिल्ली स्मॅशर्स यांच्यात चांगलीच चुरस रंगली होती. महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मालकीच्या मुंबई संघाने त्याला (जवळपास ८० लाख १९ हजार ३२ रुपये) करारबद्ध केले. राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपवर बांगी बीट्सने ७५ हजार अमेरिकन डॉलरची (जवळपास ४४ लाख ५५ हजार ६२२ रुपये) बोली लावली.
भारताची युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला लखनौ वॉरियर्सने ८० हजार अमेरिकन डॉलरला (जवळपास ४७ लाख ५२ हजार ६६४ रुपये) विकत घेतले. ज्वाला गट्टाला दिल्ली स्मॅशर्सने ३१ हजार डॉलरला (जवळपास १८ लाख ४१ हजार ६९९ रुपये) करारबद्ध केले. व्हिएतनामच्या टिन्ह मिन्ह युगेन याला विकत घेण्यासाठी दिल्ली आणि पुणे पिस्टॉन्स यांच्यात चुरस रंगली होती. अखेर पुणे संघाने त्याला ४४ हजार डॉलरला (२६ लाख १४ हजार २४ रुपये) विकत घेतले.
उघडले बॅडमिंटनचे दार!
भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात नवी क्रांती घडवू पाहणाऱ्या इंडियन बॅडमिंटन लीगच्या संकल्पनेचा पहिला टप्पा सोमवारी पार पडला. सहा संघांमध्ये रंगलेल्या बॅडमिंटनपटूंच्या लिलावात भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिचे घरच्या संघाकडून खेळण्याचे स्वप्न अखेर साकार होणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-07-2013 at 06:20 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal goes to hyderabad hotshots for usd 120000 in ibl auction