लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या कमाईनंतर बॅडमिंटनपटू सायना नेहवालवरील अपेक्षांमध्ये प्रचंड वाढ झाली. क्रिकेटव्यतिरिक्त खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा यशस्वीपणे रोवणाऱ्या मोजक्या खेळाडूंत सायनाचा समावेश झाला होता. या देदीप्यमान यशानंतर सायनाच्या कारकिर्दीचा आलेख उंचावला असता तर ते उचित ठरले असते, मात्र दुखापती आणि ढासळता फॉर्म यामुळे सायनाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला आहे. या दोन मुद्दय़ांमुळे २०१३ वर्षांत सायनाला एकाही मोठय़ा स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करणेच सायनासाठी मोठे आव्हान ठरले आहे. नुकत्याच झालेल्या डेन्मार्क स्पर्धेतही सायनाला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. सातत्याने होणारे पराभव बाजूला सारून जेतेपदासाठी नव्याने प्रयत्न करण्याची संधी सायनासमोर आहे. मंगळवारपासून फ्रेंच सुपर सीरिज स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम प्रदर्शनासह जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी सायनासमोर आहे. मात्र जेतेपदापर्यंत आगेकूच करण्यासाठीची सायनाला अथक परिश्रम करावे लागणार आहेत.
डेन्मार्क स्पर्धेत अन्य बॅडमिंटनपटूंना झटपट गाशा गुंडाळावा लागला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर अव्वल खेळाडूंना टक्कर देणे किती कठीण आहे याचा प्रत्यय यानिमित्ताने आला होता. फ्रेंच सुपर सीरिज स्पर्धेत सायनाव्यतिरिक्त खेळाडूंसमोर खडतर आव्हान आहे.
सायनाची सलामीची लढत जपानच्या थायलंडच्या निचाऑन जिंदापॉनशी होणार आहे. इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये हैदराबाद हॉटशॉट्ससाठी खेळताना सायनाने सातपैकी सात लढतीत विजय मिळवला होता. मात्र हा फॉर्म सायनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कायम राखता आलेला नाही.
मी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. जि ह्य़ुन स्युंगविरुद्ध खेळताना मी घसरले. तो किरकोळ अपघात होता. त्यानंतर मी व्यायामही केला. माझी प्रकृती आता ठीक आहे. स्युंगविरुद्ध सामना माझ्या नियंत्रणात होता. मात्र तिने चांगला खेळ करत विजय मिळवला. फ्रेंच खुल्या स्पर्धेत गेल्या वर्षी मला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या वर्षी माझ्या नशिबात काय आहे माहीत नाही. सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सायनाने सांगितले.
उदयोन्मुख खेळाडू पी.व्ही. सिंधूला डेन्मार्क स्पर्धेत सलामीच्या लढतीतच धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेल्या सिंधूला हा पराभव बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. फ्रेंच स्पर्धेत सिंधूची सलामीची लढत सहाव्या मानांकित कोरियाच्या जि ह्य़ुन स्युंगशी होणार आहे. स्युंगनेच सायनाला पराभवाचा धक्का दिला होता.
दरम्यान भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे शिस्तभंगासाठी आजीवन बंदीची शिफारस झालेली ज्वाला गट्टा या स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. डेन्मार्क स्पर्धेत खेळू न शकलेली ज्वाला आपली जुनी साथीदार अश्विनी पोनप्पाच्या साथीने खेळायला सज्ज झाली आहे. या जोडीची सलामीची लढत इंडोनेशियाच्या गेबी रिस्तियानी इमावान आणि तिअरा रोसालिआ जोडीशी होणार आहे. मिश्र दुहेरीत अश्विनी तरुण कोनाच्या साथीने खेळणार आहे.
पुरुष गटात पारुपल्ली कश्यपला सलामीच्या लढतीतच जागतिक क्रमवारीत अव्वल बलाढय़ ली चोंग वेईचा सामना करायचा आहे. जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानी असलेल्या अजय जयरामची सलामीची लढत जपानच्या काझुमासा साकाईशी आहे. डेन्मार्क स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या गुरुसाईदत्तचा मुकाबला चीनच्या चेन युइकेनशी होणार आहे.
अरुंधती पानतावणे, एच.एस. प्रणॉय, आनंद पवार, के. श्रीकांत, सौरभ वर्मा यांना पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा