चीनच्या खेळाडूंना नमवत जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटू हाँगकाँग सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. सायना नेहवालने चीन सुपरसीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदासह यंदाच्या वर्षांतील तिसऱ्या जेतेपदाची कमाई केली. दुसरीकडे किदम्बी श्रीकांतने सार्वकालीन महान खेळाडू लिन डॅनवर मात करत खळबळजनक विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूने सुपरसीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या ऐतिहासिक विजयानंतर काही तासांतच सायना, श्रीकांत यांना नव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सुपरसीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन्ही गटांत भारतीय खेळाडूंनी धडक मारून जेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ होती. दोन सुपरसीरिज जेतेपदांमुळे सायना, श्रीकांत यांच्यासह भारतीय पथकाचा आत्मविश्वास उंचावला आहे. चीनमधील प्रदर्शनाची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय बॅडमिंटनपटू आतुर आहेत.
श्रीकांतचा सलामीचा मुकाबला सातव्या मानांकित चोऊ तिआन चेन याच्याशी होणार आहे. श्रीकांत चेनविरुद्ध पहिल्यांदाच खेळणार आहे. चेनने यंदा बिट्सबर्गर स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पारुपल्ली कश्यपचा सामना थायलंडच्या ताआनगोस्क सेइनबुनसुकशी होणार आहे. आरएमव्ही गुरुसाईदत्तसमोर जपानच्या शो सासाकीचे आव्हान आहे.
चार वर्षांपूर्वी या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या सायनाची सलामीची लढत अमेरिकेच्या जेमी सुबंधीशी होणार आहे. दुखापतीमुळे चीन सुपरसीरिज स्पर्धेतून माघार घेतलेली पी.व्ही.सिंधू हाँगकाँग स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. सातव्या मानांकित सिंधूची सलामीची लढत थायलंडच्या ब्युसनान ओंगब्युमरुनशी होणार आहे.
महिला दुहेरीत ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीसमोर मलेशियाच्या यिन लू लिम-मेंग यिन ली जोडीचे आव्हान आहे. पुरुष दुहेरीत मनू अत्री-सुमित रेड्डी जोडीचा मुकाबला इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसान- हेंड्रा सेतिआवान जोडीशी होणार आहे.

Story img Loader