भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे इंडोनेशिया सुपर सीरिज स्पर्धेचे जेतेपद कायम राखण्याचे स्वप्न अखेर शनिवारी धुळीस मिळाले. जर्मनीच्या ज्युलियन शेंककडून पराभवाची नामुष्की पत्करावी लागल्यामुळे सायनाला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सायनाने २००९, २०१० आणि २०१२मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. पण चौथ्या क्रमांकाच्या ज्युलियन शेंकने सायनाचे आव्हान ५२ मिनिटांत २१-१२, १३-२१, १४-२१ असे संपुष्टात आणले. चुकीच्या फटक्यांचा वापर सायनाला भोवला. सायनाच्या सुमार खेळाचा फायदा उचलत ज्युलियनने अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
पहिल्या गेममध्ये ज्युलियनने १२-६ अशी आघाडी घेतली होती. पण सायनाने दीर्घ रॅलीवर भर देत ज्युलियनला नेटवर झुंजवले. सायनाच्या अप्रतिम खेळापुढे ज्युलियन निष्प्रभ ठरली. सायनाने सलग १५ गुण मिळवत पहिल्या गेमवर नाव कोरले. दुसऱ्या गेममध्ये ज्युलियन हिने जोमाने पुनरागमन करत ६-० अशी आघाडी घेतली. सायनाने दीर्घ रॅलींमध्ये ज्युलियनला गुंतवून ठेवले. पण या वेळी ज्युलियनचे फटके अचूक बसत होते. सायनाने अनेक फटके नेटवर आदळल्यामुळे ज्युलियनने ११-४ अशी आघाडी घेतली. सायनाचा प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा मिळत असल्यामुळे तिचा आत्मविश्वास उंचावत होता. पण तिचा खेळ बहारदार होत नव्हता. सायनाने नेटवर केलेल्या सुमार खेळामुळे ज्युलियनने सलग नऊ गुण मिळवत २०-११ अशी सरशी साधली. सायनाने दोन गेमपॉइंट वाचवले. पण क्रॉसकोर्टचा सुरेख फटका लगावून ज्युलियनने दुसरा गेम जिंकून सामन्यात बरोबरी साधली.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाने रॅलीवर भर दिला. पण ज्युलियन तिच्याकडून होणाऱ्या चुकांची वाट पाहत होती. स्मॅशचे जोरदार फटके आणि नेटवर अप्रतिम खेळ करत ज्युलियनने ११-५ अशी मोठी आघाडी घेतली. तिने सायनाला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. सायनाने शांतचित्ताने खेळ करत ज्युलियनला चुका करण्यास भाग पाडले. त्यामुळे सायनाने १४-१६ अशी पिछाडी भरून काढली. पण त्यानंतर सायनाला एकही गुण मिळवता आला नाही. ज्युलियनने सलग सात गुण मिळवून तिसऱ्या गेमसह अंतिम फेरीत आगेकूच केली. अंतिम फेरीत तिची गाठ चीनच्या अव्वल मानांकित झुरेई ली हिच्याशी पडेल.

Story img Loader