शानदार फॉर्म कायम राखत सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी फ्रेंच सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. तथापि, युवा किदम्बी श्रीकांतला पराभवाला सामोरे जावे लागले आणि रशियन साथीदारासह खेळणाऱ्या अश्विनी पोनप्पाचे आव्हान संपुष्टात आले.
पाचव्या मानांकित सायनाने स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमूरवर २१-१९, २१-१६ असा विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये मुकाबला ७-७ असा बरोबरीत होता. त्यानंतर सायनाने सातत्याने आघाडी मिळवत पहिला गेम नावावर केला. भरवशाच्या स्मॅशच्या फटक्याच्या जोरावर सायनाने वर्चस्व गाजवले. दुसऱ्या गेममध्ये सायनाने सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर दिला. नेटजवळून चापल्यपूर्ण खेळ करत तिने गिलमूरला निष्प्रभ केले.
सलामीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असणाऱ्या जपानच्या केनिची टागोला नमवणाऱ्या कश्यपने दुसऱ्या फेरीच्या लढतीत चीनच्या हौऊवेई तिआनवर २१-१९, २१-१८ अशी मात केली.  नुकत्याच झालेल्या डेन्मार्क सुपर सीरिज  स्पर्धेत झटपट गाशा गुंडाळावा लागला होता.
दरम्यान, मिश्र दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि रशियाच्या व्लादिमीर इव्हानोव्ह जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या ल्यु की आणि ह्य़ुआंग याक्विंग जोडीने अश्विनी-इव्हानोव्ह जोडीवर २१-८, १८-२१, २१-९ अशी मात केली.
कश्यप, श्रीकांतला क्रमवारीत बढती
नवी दिल्ली : पारुपल्ली कश्यप आणि किदम्बी श्रीकांत यांनी जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सात स्थानांनी आगेकूच केली आहे. श्रीकांत १६व्या तर कश्यप २१व्या स्थानी आहेत. सायना नेहवालने एका स्थानाने सुधारणा करत सहावे स्थान पटकावले आहे. युवा पी.व्ही. सिंधू दहाव्या स्थानी स्थिर आहे. मलेशियाचा ली च्योंग वेई आणि लि झुरुई अनुक्रमे पुरुष आणि महिला क्रमवारीत अग्रस्थानावर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा