बॅडमिंटन विश्वाचा विश्वचषक अशी बिरुदावली मिळालेल्या थॉमस आणि उबेर चषकाला दिल्लीत रविवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्यांदाच आयोजनाची संधी मिळालेल्या भारताला केवळ संयोजक म्हणून नव्हे तर गुणवत्तेच्या बळावर सक्षम असल्याचे सिद्ध करण्याची संधी आहे. थॉमस चषकात भारतीय संघाची सलामी बलाढय़ मलेशियाशी तर उबेर चषकात कॅनडाशी होणार आहे.
थॉमस आणि उबेर चषकावर चीन, इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांची मक्तेदारी राहिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या जोरावर या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी भारताला हे चांगले व्यासपीठ आहे. पुरुषांसाठीच्या थॉमस चषकात भारतीय संघ आठ वेळा तर महिलांसाठीच्या उबेर चषकात तीन वेळा सहभागी झाला आहे.
सायना नेहवालच्या दमदार कामगिरीच्या जोरावर महिला संघाने २०१० मध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. याच वर्षी पुरुष संघानेही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत घोडदौड केली होती. दरम्यान शेवटच्या अर्थात २०१२ साली वुहान, चीन येथे झालेल्या थॉमस आणि उबेर चषकासाठी भारतीय संघ पात्र ठरू शकला नव्हता. हा कटू इतिहास पुसण्याची संधी भारतीय संघाला घरच्या मैदानावर मिळणार आहे.
थॉमस चषकात भारताला मलेशिया, दक्षिण कोरिया आणि जर्मनीचे आव्हान असणार आहे तर उबेर चषकात थायलंड, कॅनडा आणि हाँगकाँगशी लढत होणार आहे. तीन एकेरी आणि दोन दुहेरी असे स्वरूप असल्याने सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत यांच्यावर भारताची भिस्त असणार आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा जोडीकडून भारताला मोठय़ा अपेक्षा आहेत.
पुरुषांमध्ये श्रीकांत पहिली तर कश्यप दुसरी लढत खेळणार आहे. सौरभ वर्मा, आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि बी. साईप्रणीत यांच्यापैकी एकाची एकेरीच्या तिसऱ्या लढतीसाठी निवड होणार आहे.
अरुंधतीऐवजी सायलीची निवड
भारताच्या उबेर चषकासाठीच्या संघात बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त अरुंधती पनतावणे ऐवजी सायली गोखलेचा समावेश करण्यात आला आहे. एकेरीच्या तिसऱ्या लढतीसाठी अरुंधतीची निवड करण्यात आली होती. ‘सराव शिबिरादरम्यान खेळताना माझ्या खांद्याला दुखापत झाली. आणखी एक आठवडा तरी मला खेळता येणार नाही. हे खुपच वाईट आहे,’’ असे अरुंधती म्हणाली.