कार्यक्रमाची मदार असणाऱ्या व्यक्तीनेच उद्घाटनापूर्वीच माघार घेतल्यावर जशी परिस्थिती होईल, तशीच प्रीमिअर बॅडमिंटन लीगची (पीबीएल) झाली. भारताची अव्वल बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला डोळ्यापुढे ठेवून पीबीएलची आखणी करण्यात आली होती. पण स्पर्धेपूर्वीच सायनाने माघार घेतल्यामुळे पीबीएलचा पूर्णपणे विचका झाल्याचेच पाहायला मिळाले. सायना उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होती, तिने रॅकेट हातात धरत सरावही केला, पण तिच्या खेळाची जादू पाहायला मिळणार नसल्याचे समजताच पीबीएलची मैफल सुनी झाली.
‘‘तीन आठवडय़ांपूर्वी मी सरावाला सुरुवात केली. माझ्या पायाची दुखापत गंभीर आहे. त्यातून सावरण्याची प्रक्रिया सुरू आहे,’’ असे सायना म्हणाली आणि पीबीएलमधली उत्सुकताच हवेत विरुन गेली.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सायनाला पीबीएलमध्ये ६६ लाख ७८ हजार रुपये एवढी मोठी रक्कम मोजत अवध वॉरियर्सने आपल्या संघात घेतले होते. पण ती खेळणार नसल्याने पीबीएलबरोबरच अवध वॉरियर्स संघाचेही मोठे नुकसान झाले आहे.
सायना पुढे म्हणाली की, ‘‘हे ऑलिम्पिकचे वर्ष आहे. त्यामुळे मला कोणत्याही प्रकाराचा धोका पत्करायचा नाही. दुखापतीतून पूर्ण सावरल्यानंतरच मी खेळायला सुरुवात करणार आहे.’’
सायनाला केंद्रस्थानी ठेऊनच पीबीएलचा घाट घालण्यात आला होता.पीबीएलच्या हंगामाची सुरुवात मुंबईत दणक्यात होणे अपेक्षित होते. सायना मुंबईत खेळणार हे शनिवारच्या खेळाचे आकर्षण होते. मात्र सामना सुरू होण्यापूर्वी सायनाने माघार घेतली आणि चाहत्यांची निराशा झाली.
पीबीएलबद्दल सायना म्हणाली की, ‘‘कारकीर्दीत पहिल्यांदाच मी न खेळता संघाला पाठिंबा देणार आहे. माझीही खेळण्याची मनापासून इच्छा होती. पीबीएल भारतीय खेळाडूंसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे.’’
पारुपल्ली कश्यप, एच. एस. प्रणॉय, किदम्बी श्रीकांत हे त्रिकुट आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकते आहे. मात्र अजूनही त्यांच्या नावावर स्टेडियममध्ये गर्दी जमू शकत नाही. ज्वाला आणि अश्विनी ही दुहेरीची जोडी तसेच युवा पी.व्ही.सिंधू यांच्या तुलनेतही सायनाचीच लोकप्रियता सर्वाधिक आहे. ही जाणीव असल्यानेच लीगच्या सलामीच्या लढतीत सायनाचा समावेश असलेल्या अवध वॉरियर्सचा समावेश करण्यात आला. मात्र सायनाने आयत्यावेळी माघार घेतल्याने सगळेच फिस्कटले. त्यातच सुमार दर्जाचा उद्घाटन सोहळा, स्पर्धेचा सदिच्छादूत आणि बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारची अनुपस्थिती यामुळे चाहत्यांच्या अपेक्षांवर विरजणच पडले. लीगच्या अन्य पाच टप्प्यांत सायना खेळणार का या चिंतेने आता संयोजकांना घेरले आहे.