सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू आगामी चीन मास्टर्स सुपर सीरिज स्पर्धेत सहभागी होणार नाही. १० ते १५ सप्टेंबर या कालावधीत चीनमधील चांगझुओ येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व पुरुष एकेरीपुरते मर्यादित असणार आहे. अजय जयराम आणि आनंद पवार या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
‘‘मी चीन मास्टर्स स्पर्धेत खेळणार नाही. मात्र जपान येथे होणाऱ्या स्पर्धेत मी सहभागी होणार आहे,’’ असे सायनाने सांगितले. जपानमधील स्पर्धेकरिता योग्य आणि पुरेसा सराव होण्याच्या दृष्टीने या दोघी चीनमधील स्पर्धेत खेळणार नसल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष टीपीएस पुरी यांनी सांगितले. विश्व अजिंक्यपद स्पर्धेपूर्वीच मुख्य प्रशिक्षकांनी हे ठरवले होते. इंडियन बॅडमिंटन लीगनंतर या दोघी हैदराबाद येथे होणाऱ्या शिबिरात सहभागी होणार आहेत, असे पुरी यांनी पुढे सांगितले. जपान सुपर सीरिज स्पर्धा टोकियोमध्ये १७ ते २२ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

Story img Loader