दोन सलग पराभव बाजूला ठेवून भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने जर्मनीच्या ज्युलियन श्चेंक हिच्यावर २१-७, २१-१८ असे निर्विवाद वर्चस्व गाजवत विजय मिळवला. या शानदार विजयासह सायनाने सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ‘ब’ गटाच्या दोन लागोपाठच्या लढतीत सायनाला पराभवाला सामोरे जावे लागले होते मात्र श्चेंकवर मोठय़ा फरकाने मात करून तिने उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. सायनाला पराभूत करणाऱ्या रात्चानोक इननॉनने श्चेंकवर मात केली होती. या सगळ्यामुळे सायनाचा उपांत्य फेरीतील प्रवेश गणितीय समीकरणावर अवलंबून होता. मात्र या कशाचेही दडपण न घेता आणि दुखापतीची पर्वा न करता सायनाने बहारदार खेळ करत विजय साकारला.
पहिल्या गेममध्ये सायनाने दमदार आघाडी घेतली. या आघाडीच्या आधारेच सायनाने सहजपणे पहिल्या गेमवर कब्जा केला. संपूर्ण कोर्टवर सहज वावर करत सायनाने श्चेंकला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. स्मॅशच्या फटक्यांचा खुबीने वापर आणि नेटजवळून चतुराईने खेळ करत सायनाने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये एकेक गुणासाठी श्चेंकने सायनाला झुंजवले. शेवटच्या गुणापर्यंत मुकाबला चुरशीचा झाला. १८-१९ अशा स्थितीतून सायनाने तीन गुण कमावत विजयावर शिक्कामोर्तब केले.
पहिल्या सामन्यात डेन्मार्कच्या टीने बाऊनकडून तर दुसऱ्या सामन्यात थायलंडच्या रात्चानोक इननॉनकडून झालेल्या पराभवाचा फटका सायनाला बसला. एकूण गेम जिंकण्याच्या सरासरीत सायना पिछाडीवर होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायनाने त्यानंतर डेन्मार्क स्पर्धेचे जेतेपद नावावर केले होते. त्यानंतर मात्र गुडघ्याच्या दुखापतीने तिला हैराण केले होते. ही दुखापत पूर्णपणे बरी झालेली नसतानाही सायनाने वर्षअखेरीच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय सार्थ ठरवला.
सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धा :सायना उपांत्य फेरीत
दोन सलग पराभव बाजूला ठेवून भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने जर्मनीच्या ज्युलियन श्चेंक हिच्यावर २१-७, २१-१८ असे निर्विवाद वर्चस्व गाजवत विजय मिळवला. या शानदार विजयासह सायनाने सुपर सीरिज फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
First published on: 15-12-2012 at 02:19 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal reaches semi final