बॅडमिंटनमध्ये भारताला पहिलेवहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिल्यानंतर सायनाने विश्रांती घेतली होती. यामुळे ती चीन मास्टर्स, जपान खुली स्पर्धा तसेच राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत खेळू शकली नव्हती. सायना आता डेन्मार्क आणि फ्रान्समधील स्पर्धेत खेळणार आहे.
डेन्मार्कमधील स्पर्धेसाठी तिला तिसरे मानांकन देण्यात आले आहे.सायनाचा सलामीचा सामना कोरियाच्या यिआन ज्यु बेशी होणार आहे. हा अडथळा पार करीत तिने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारल्यास तिथे तिला टिने बूनचा मुकाबला करावा लागेल. हा टप्पाही ओलांडल्यास उपांत्य फेरीत तिची गाठ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या यिहान वांगशी होणार आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने टिने बूनवर मात केली होती, मात्र यिहानने उपांत्य फेरीत तिला नमवले होते.
माझी तयारी चांगली झाली आहे. गेल्या पाच आठवडय़ांपासून माझा सराव सुरू आहे. मला ताजेतवाने वाटत आहे. डेन्मार्क आणि फ्रान्स येथील स्पर्धामध्ये माझी कामगिरी चांगली होईल, असा विश्वास वाटत असल्याचे सायनाने सांगितले.
पुरुष गटात सौरभ वर्मासमोर जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या पीटर गेडचे आव्हान आहे तर अजय जयरामला चीनच्या पेंग्यु डय़ूचा सामना करायचा आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि तरुण कोना यांची लढत इंडोनेशियाच्या मार्किस किडो आणि पिया झेबडियाह बर्नडेथशी होणार आहे. पुरुष दुहेरीत तरुण अरुण विष्णूच्या साथीने खेळणार असून, त्यांचा सलामीचा मुकाबला इंडोनेशियाच्या अंग्गा प्रतामा आणि रायन आँग्युंग सापुत्रशी होणार आहे.     

Story img Loader