दुखापत आणि सातत्यपूर्ण खेळाच्या अभावामुळे सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत या भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटूंना गेल्या काही स्पर्धामध्ये साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यामुळे मंगळवारपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेत त्यांच्यासमोर जेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे. मात्र, ही निराशाजनक कामगिरीची मरगळ झटकून सायना व श्रीकांत जेतेपद पटकावतील का, याची साऱ्यांनाच उत्सुकता असेल.
ओटीपोटातील दुखापतीमुळे सायनाच्या कामगिरीवर परिणाम झाला होता. त्यामुळे जपान, डेन्मार्क आणि फ्रान्स सुपर सीरिज स्पध्रेत तिला समाधानकारक खेळ करण्यात अपयश आले होते. यातून सावरत सायना नव्या दमाने कोर्टवर उतरणार आहे.
‘‘माझ्या ओटीपोटात दुखत होते आणि टाचांच्या दुखण्यामुळे मी अस्वस्थही होते, परंतु आता मी तंदुरुस्त आहे. गेल्या काही आठवडय़ांत कसून सराव केला असून चांगल्या कामगिरीसाठी मी प्रयत्नशील आहे. हे ऑलिम्पिक वर्ष आहे आणि त्यादृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे,’’ असे मत सायनाने व्यक्त केले.
अव्वल मानांकित सायनासमोर चीनच्या सून युचे आव्हान असेल. सूनविरुद्ध सायनाने पाच सामन्यांत ४ विजय मिळवले आहेत. जागतिक क्रमवारीत दोन वेळा कांस्यपदक जिंकणाऱ्या पी.व्ही. सिंधूकडून महिला एकेरीत अपेक्षा उंचावल्या आहेत. नुकत्याच झालेल्या डेन्मार्क खुल्या स्पध्रेत सिंधूने अंतिम फेरीत धडक मारली होती. तिला पहिल्या फेरीत रशियाच्या क्सेनीआ पिलोकार्पोव्हाशी सामना करावा लागेल.
श्रीकांतही दुखापती आणि वाईट फॉर्मशी झगडत आहे. पायाच्या दुखापतीमुळे श्रीकांतने आशियाई अजिंक्यपद स्पध्रेतून माघार घेतली होती, तर जपान, कोरिया, डेन्मार्क आणि फ्रान्स स्पध्रेत त्याचे आव्हान झटपट संपुष्टात आले होते. पाचवा मानांकित श्रीकांत पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या हु युन याच्याशी सामना करेल. तीनपैकी दोन लढतीत युनवर विजय मिळवल्यामुळे श्रीकांतचे पारडे जड मानले जात आहे. पारुपल्ली कश्यपला दुखापतीमुळे या स्पध्रेला मुकावे लागणार आहे, तर एच.एस.प्रणॉय आणि अजय जयराम यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना पहिल्या फेरीत जपानच्या नाओको फुकूमन आणि कुरूमी योनाओ यांच्याशी सामना करावा लागेल. मनु अत्री आणि बी. सुमीथ रेड्डी यांनी स्पध्रेतून माघार घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा