आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल दर्जाच्या खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचा विचार न करता स्पर्धाची भरगच्च कार्यक्रमपत्रिका तयार केल्याबद्दल भारताची ऑलिम्पिकपटू सायना नेहवालने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघावर (बीडब्ल्यूएफ) कडाडून टीका केली आहे.

महासंघाने २०१८ मध्ये अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी कमीतकमी १२ स्पर्धामध्ये भाग घेणे अनिवार्य केले आहे. या बाबत सायना म्हणाली, ‘‘कोणत्याही खेळाडूला बाराही महिने लागोपाठ स्पर्धामध्ये भाग घेणे शक्य नसते. किमान काही दिवस विश्रांती घेण्याची आवश्यकता असते. या कार्यक्रमपत्रिकेमुळे खेळाडूंच्या तंदुरुस्तीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जागतिक स्पर्धेपूर्वी तीन सुपरसीरिज स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. या स्पर्धानंतर खेळाडूंना विश्रांतीच मिळणार नाही.’’

वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार काय, असे विचारले असता सायना म्हणाली, ‘‘राष्ट्रीय स्पर्धेचा कालावधी फारसा लांबलचक नसतो. त्यामुळे त्यामध्ये भाग घेताना अडचण येत नाही. पुढील वर्षी आशियाई व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंची शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची कसोटीच ठरणार आहे. पैशाच्या मागे धावणे मला अजिबात आवडत नाही. त्या ऐवजी तंदुरुस्तीला मी केव्हाही प्राधान्य देईन.’’

‘‘जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविण्याची मला खात्री नव्हती, कारण या स्पर्धेपूर्वी झालेल्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये मला पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. या स्पर्धेत माझ्यापेक्षा अनेक सर्वोत्तम कौशल्य असलेले खेळाडू सहभागी झाले होते, हे लक्षात घेता माझी कामगिरी खूपच समाधानकारक झाली आहे,’’ असेही सायना हिने सांगितले.

सायना ही तीन वर्षांनी पुन्हा पुल्लेला गोपीचंद यांच्या अकादमीत सराव करू लागली आहे. गेली तीन वर्षे ती प्रकाश पदुकोन यांच्या अकादमीत विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होती. या बदलांविषयी सायना म्हणाली, ‘‘गोपीचंद यांना मार्गदर्शनाबाबत विचारल्यानंतर त्यांनी तत्परतेने होकार दिल्यानंतर मी त्यांच्या अकादमीत सराव करू लागले आहे.’’

सायनाच्या मताशी मरिनही सहमत

लागोपाठच्या स्पर्धामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर अनिष्ट परिणाम होणार आहे. प्रत्येक खेळाडूच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीच्या समस्या असतात. याचा विचार महासंघाने केला पाहिजे. ऑल इंग्लंड स्पर्धेपासून नवीन नियमावलीचा उपयोग केला जाणार आहे. ही नियमावली अन्यायकारक आहे. विशेषत: दुहेरीतील खेळाडूंना काही नियम त्रासदायक ठरणार आहेत. पुढील वर्ष माझ्यासाठीही आव्हानात्मक आहे. तरीही जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकन मिळविण्यावर माझा भर राहणार आहे, असे ऑलिम्पिक विजेती बॅडमिंटनपटू कॅरोलिन मरीनने सांगितले.

 

Story img Loader