क्वालालम्पूर : भारताच्या सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांचे मलेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आव्हान मंगळवारी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन सुवर्णपदक विजेत्या सायनाची गेल्या वर्षीपासूनची अपयशी मालिका कायम राहिली. दुखापतीमुळे गेल्या वर्षी सायनाच्या खेळावर परिणाम झाला होता. यातून ती अजून स्थिरावलेली नाही. सायनाला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत चीनच्या हॅन यूएकडून १२-२१, २१-१७, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानावर घसरण झालेल्या सायनाने या सामन्यातील पहिला गेम आठ गुणांच्या फरकाने गमावला होता. मात्र, त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तिला पुनरागमन करण्यात यश आले. तिने हा गेम चार गुणांनी जिंकला. परंतु तिसऱ्या गेममध्ये सायना पुन्हा आपला सर्वोत्तम खेळ करू शकली नाही, परिणामी तिने सामना गमावला आणि तिला स्पर्धेबाहेर जावे लागले.
पुरुष एकेरीत यापूर्वी जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानापर्यंत मजल मारणाऱ्या श्रीकांतला बिगरमानांकित केंटा निशिमोटोकडून १९-२१ १४-२१ अशी ४२ मिनिटांत हार पत्करावी लागली. श्रीकांतने दोन्ही गेममध्ये झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे प्रयत्न अपुरे पडले. या दोघांपाठोपाठ उदयोन्मुख खेळाडू आकर्षी काश्यपलाही पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत तैवानच्या वेन ची सू हिने आकर्षीला २१-१०, २१-८ असे सहज पराभूत केले.