आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपदाचा दुष्काळ संपवत पुन्हा अव्वल दर्जाची कामगिरी करीन, असा आत्मविश्वास भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केला.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सायनाला यंदाच्या मोसमातील थायलंड, इंडोनेशियन व सिंगापूर खुल्या या तीन स्पर्धामध्ये उपांत्य फेरीतही स्थान मिळवता आले नव्हते. विजेतेपदापासून वंचित राहिल्यामुळे मी निराश झालेले नाही असे सांगून सायना म्हणाली, ‘‘अजिंक्यपद पटकावता न आल्याने मी दु:खी झाले नाही. शंभर टक्के तंदुरुस्त असल्यास मी सर्वोत्तम खेळ करू शकते. जेव्हा सर्वोत्तम खेळ होतो, तेव्हाच मी विजेतेपद मिळवू शकते. काही वेळा लहान दुखापतीही तुम्हाला त्रास देतात. जर गुडघा तुम्हाला सतावत असेल तर तुम्हाला अपेक्षेइतकी कामगिरी करता येत नाही.
भारतीय बॅडमिंटन लीगतर्फे (आयबीएल) आयोजित केलेल्या ‘शटल एक्सप्रेस’ कार्यक्रमाचे उद्घाटन सायनाच्या हस्ते करण्यात आले. ती म्हणाली, ‘‘या तीन स्पर्धापूर्वी एकच आठवडा सराव करण्याची संधी मिळाली होती. केवळ एक आठवडय़ाच्या सरावानंतरही मी उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठू शकले. व्यवस्थित सराव झाला असता तर जेतेपदासह भारतात परतले असते. मला बऱ्याच कालावधीनंतर सहा आठवडे विश्रांती घेण्याची संधी मिळाली. आता मी पूर्णपणे तंदुरुस्त झाले आहे. आगामी जागतिक स्पर्धेत सर्वोत्तम यश मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील.’’
‘‘भारतीय बॅडमिंटन लीग ही देशातील बॅडमिंटनच्या प्रसाराकरिता चांगली स्पर्धा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंनी या खेळात चांगली प्रगती केली आहे. अशा स्पर्धाचे आयोजन वारंवार झाले पाहिजे. ही स्पर्धा म्हणजे वरिष्ठ गटातील खेळाडूंबरोबरच कनिष्ठ गटातील खेळाडूंनाही आपले कौशल्य दाखविण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे.’’
सर्वोत्तम कामगिरीची सायनाला खात्री
आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपदाचा दुष्काळ संपवत पुन्हा अव्वल दर्जाची कामगिरी करीन, असा आत्मविश्वास भारताची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने व्यक्त केला.
First published on: 13-07-2013 at 07:48 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal vows to bounce back at badminton world championship