इंडियन बॅडमिंटन लीगच्या अध्यायाला गुरुवारपासून सुरुवात झाली असली तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चाहत्यांना बॅडमिंटन या खेळाची खरी पर्वणी लुटता येणार आहे. सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या देशातील दोन अव्वल महिला बॅडमिंटनपटू.. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेती सायना वि. अलीकडेच झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकावर मोहोर उमटवणारी सिंधू, अशी फटक्यांची आतषबाजी गुरुवारी नवी दिल्लीत रंगणार आहे. हैदराबाद हॉटशॉट्स आणि अवध वॉरियर्स यांच्यात रंगणाऱ्या लढतीकडे तमाम क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे.
पुलेला गोपीचंद अकादमीत सराव करणाऱ्या या दोघी एकमेकांविरुद्ध एकही व्यावसायिक सामना खेळल्या नाहीत. त्यामुळे या सामन्याविषयी सर्वानाच कमालीची उत्सुकता आहे. दुखापती आणि खराब फॉर्मात असलेल्या सायनाची या मोसमात कामगिरी चांगली झालेली नाही. त्यामुळे सायनाला बऱ्याच प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये मोठी झेप घेता आली नाही. त्याउलट सिंधूची कामगिरी चांगली होत आहे. नुकत्याच झालेल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सिंधूने चीनच्या मातब्बर खेळाडूंवर मात करून कांस्यपदकाला गवसणी घातली होती. या ऐतिहासिक कामगिरीमुळे सिंधूचा आत्मविश्वास उंचावला आहे.
या सामन्यात सिंधूच बाजी मारेल, असे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र या सामन्याविषयी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणतात, ‘‘भविष्यात अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धामध्ये सायना आणि सिंधू आमनेसामने असतील, अशी आशा आहे. त्यामुळे कोण जिंकला अथवा हरला, याचा विचार करण्यापेक्षा सुवर्ण आणि रौप्यपदक भारताकडेच राहील.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा